महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Cyclone Tauktae LIVE : चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने - महाराष्ट्र तौक्ते

Tauktae Cyclone LIVE Updates
तौक्ते चक्रीवादळ

By

Published : May 17, 2021, 8:32 AM IST

Updated : May 17, 2021, 10:33 PM IST

22:29 May 17

विक्रोळीत झोपडपट्टीमधील घरावरील पत्रे उडाले; घरांचे नुकसान

22:13 May 17

रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वादळ शांत, पाऊसही थांबला

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

रत्नागिरी - तौक्ते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी पडझड करुन उत्तरेकडे सरकले. या वादळाने रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक घरे आणि झाडांचे मोठं नुकसान केले आहे. महसूल खात्याने तत्काळ पंचनामे करण्याचे काम हाती घेतले आहे. रविवारी दुपारपासून सुरू झालेली पावसाची संततधार सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास थांबली. आज वादळ शांत झाल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत होतं. समुद्रही दुपारनंतर काहीसा शांत झाला होता.  

20:48 May 17

चक्रीवादळामुळे राज्यात एकूण 6 जणांचा मृत्यू तर 9 जखमी

मुंबई -तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 9 जण यात जखमी झाले आहेत.  

20:33 May 17

तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5 कोटी 77 लाखांचे नुकसान, दोघांचा मृत्यू

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे सुमारे 5 कोटी 77 लक्ष 45 हजार 117 रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. या वादळामुळे मच्छिमार नौका बुडून दोन मच्छिमारांचा मृत्यू झाला आहे. तर तिघेजण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा प्रशासन स्थानिकांच्या मदतीने शोध घेत आहे. जिल्ह्यात अजूनही पावसाचा जोर ओसरलेला नाही. यात खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.  

20:24 May 17

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मांडवी समुद्र किनारी वादळाचा प्रभाव; उद्या धडकण्याची शक्यता

कच्छ जिल्ह्यातील मांडवी समुद्र किनाऱ्यावरून प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

कच्छ(गुजरात) - तौक्ते चक्रीवादळ आता मुंबईवरून गुजरातच्या दिशेने सरकले आहे. हे चक्रीवादळ उद्या गुजरातच्या पोरबंदर आणि मांडवी किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. कच्छ जिल्ह्यातील मांडवी समुद्र किनारी या चक्रीवादळाचा प्रभाव आता जाणवू लागला आहे. 

19:43 May 17

मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

मुंबई -तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत काही प्रमाणात नुकसान झाले आहे. निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला.  चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाऊस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याचे आणि मदतकार्य वेगाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.  

19:37 May 17

घाटकोपरला महापौरांची भेट

मुंबई - जोरदार वारे वाहत असून तसेच मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे घाटकोपर येथील पंतनगरच्या आर. एन. नारकर मार्गावरील महाकाय वृक्ष उन्मळून पडले आहे. तसेच घाटकोपर बस डेपो जवळील लक्ष्मीबाग नाला तुडुंब भरून वाहत आहे. नाल्याकाठावरील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दोन्ही ठिकाणी भेट देऊन सद्यस्थिती जाणून घेतली.  

18:53 May 17

मुंबई विमानतळावरील सर्व उड्डाणे आज रात्री 8 वाजेपर्यंत रद्द

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आज रात्री 8 वाजेपर्यंतच्या सर्व विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव जाणवत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

18:45 May 17

बॅाम्बे हायजवळील बार्जवर अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू

मुंबई - समुद्र किनारी असलेल्या बॅाम्बे हायजवळील बार्जवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी नौदलाचे मदत कार्य सुरू आहे. चक्रवादळाची तीव्रता अधिक असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. मात्र, नौदलाच्या आयएनएस कोची व आयएनएस तलवार या जहाजांमार्फत बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

18:36 May 17

चक्रीवादळाने रायगडात तीन जणांचा मृत्यू

रायगड - तौक्ते चक्रीवादळाने रायगडात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. नीता नाईक, सुनंदा बाई घरत, रामा कातकरी या तीन जणांचा वादळाने बळी घेतला आहे.  

17:37 May 17

रात्री 8 वाजेपर्यंत पालघरमध्ये हाय अलर्ट

पालघरमधील वादळाची स्थिती

पालघर - चक्रीवादळाचा धोका पालघर जिल्ह्याला कायम आहे. रात्री 8 वाजेपर्यंत पालघरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. पालघर जिल्ह्याच्या पालघर, डहाणू येथील किनारपट्टी भागासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यामुळे जव्हार, विक्रमगड भागात अनेक दुकाने आणि घरांवरील छप्पर उडाले आहेत.  

17:04 May 17

तौक्ते चक्रीवादळाने रायगडमध्ये घेतले तिघांचे बळी

रायगडमधली परिस्थिती

रायगड -रायगड जिल्ह्यात 17 मेच्या मध्यरात्रीपासून तौक्ते चक्रीवादळ समुद्रात येऊन धडकले. तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव हा निसर्ग चक्रीवादळा इतका जाणवला नसला तरी सोसाट्याच्या वाऱ्याने आणि मुसळधार पावसाने रायगडकरांना बारा तासाहून अधिक तास भीतीच्या छायेखाली ठेवले होते. या चक्रीवादळात तीन व्यक्तीचा मृत्यू झाला असून, 1886 घरांचे अंशतः तर पाच घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे. दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. वादळाच्या अनुषंगाने 2263 कुटूंब आणि 8383 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. जिल्ह्यात वादळी वाऱ्याने ठिकठिकाणी झाडे, विजेचे खांब पडले असून, युद्धपातळीवर प्रशासनाकडून त्वरित हालचाल करून रस्ते मोकळे केले आहेत. तर विजेचे खांब ही उभे केले आहेत. वादळी वाऱ्याचे संकट अजूनही रायगडकरांच्या डोक्यावर घोंघावत आहे.

16:47 May 17

तौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार

मुंबई - तौक्ते चक्रीवादळ पश्चिम मुंबईपासून 120 किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबईमध्ये कुलाबामध्ये प्रति ताशी १०२ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. या चक्रीवादळाचा वेग आता अधिक तीव्र होत आहे आणि त्याच बरोबर आज रात्री आठ ते अकरा वाजण्याच्या दरम्यान ते गुजरातला धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


 

16:38 May 17

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मुंबई पालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षात दाखल

मुंबई -तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मुंबई महापालिकेत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट दिली आहे. मुंबईतील परिस्थितीचा व महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, चार अतिरिक्त आयुक्त, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव हे उपस्थित होते.  

16:24 May 17

मुंबईत वादळीवाऱ्यासह पाऊस सुरू

प्रतिनिधी विशाल सवणे यांनी घेतलेला आढावा

मुंबई-तौक्ते चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेन सरकत आहे. मुंबईतदेखील जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यासंदर्भातला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांनी...

16:02 May 17

बॉम्बे हायजवळील 273 कर्मचाऱ्यांच्या मदतीला भारतीय नौदलाचे जहाज रवाना

मुंबई - तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव पाहता मुंबईजवळ असलेल्या अरबी समुद्रातील बॉम्बे हायजवळ असलेल्या बार्ज 305 हिरा ऑइल फिल्ड्सच्या परिसरात काम करणारे 273 कर्मचारी अडकले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची या नौकेला मदत कार्यासाठी पाठवण्यात आले आहे. याबरोबरच भारतीय नौदलातर्फे आणखी काही जहाजं भारताच्या पश्चिम समुद्रकिनारी तैनात करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

15:22 May 17

तौक्ते चक्रीवादळ हळूहळू उत्तरेकडे सरकू लागले

मुंबई - तौक्ते चक्रीवादळ हे आता हळूहळू उत्तरेकडे सरकू लागले आहे. सध्या वादळ मुंबईच्या वायव्य भागाकडून गुजरातच्या दिशेनं सरकत आहे. मुंबईपासून हे वादळ वायव्य दिशेस 142 किलोमीटर दूर आहे. तर दिव्यापासून हे वादळ 182 किलोमीटर दूर आहे.

15:05 May 17

तौक्ते चक्रीवादळ : दुपारी 1 वाजेपर्यंत मुंबईतील 221 झाडांचा वादळाने घेतला बळी

मुंबईतील 221 झाडांचा वादळाने घेतला बळी

मुंबई -तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका आज मुंबईतील झाडांना बसला आहे. सुसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे संपूर्ण मुंबईत मिळून दुपारी 1 वाजेपर्यंत 221 झाडे उन्मळून पडल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'ईटीव्ही भारत' ला दिली आहे. त्याचवेळी झाडे पडून आतापर्यंत 15 गाड्यांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, ज्या महत्वाच्या, रहदारीच्या रस्त्यावर झाडे पडली आहेत, त्या ठिकाणची उन्मळून पडलेली झाडे हटवण्याचे काम सद्या वेगात सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.  

14:05 May 17

तौत्के चक्रीवादळाचा तडाखा मुंबईच्या ट्रॉम्बे जेट्टीलाही बसला..

  • तौत्के चक्रीवादळाचा तडाखा मुंबईच्या ट्रॉम्बे जेट्टीलाही बसला.
  • या ठिकाणी सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस आणि उसळणाऱ्या मोठ्या लाटांमुळे काही बोटींचे नुकसान झाले आहे.
  • या वादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी ट्रोम्बे कोळीवाडा येथे भेट दिली. त्यांनी कोळी बांधवांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.

14:04 May 17

मुंबईला चक्रीवादळाचा तडाखा सखल भागात पाणी साचले

मुंबई -अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे कोसळलेल्या मुसळधार सोमवारी मुंबईला झोडपून काढले. पावसाची संततधार सुरु राहिल्याने मुंबईतील सखल भागात पाणी साचले. रस्ते, रेल्वे वाहतूकीवरही याचा परिणाम झाला. दरम्यान किंग्ज सर्कल, सायन, गांधी मार्केट, हिंदमाता, परळ, घाटकोपर, कुर्ला, चेंबूर, टिळकनगर, गोरेगाव येथील रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले होते.

14:04 May 17

सिंधुदुर्गात चक्रीवादळामुळे एका खलाशाचा मृत्यू तर तीन खलाशी बेपत्ता, दोन बोटी बुडाल्या

सिंधुदुर्ग - तौक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्गच्या किनाऱ्याला मोठा फटका बसला आहे. देवगडच्या आनंदवाडी बंदरात नांगरून ठेवलेल्या आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. या अपघातात एका खलाशाचा मृत्यू तर तीन खलाशी बेपत्ता झाले आहे. तीन खलाशांची या घटनेत प्राण वाचले आहेत. किनारी भागात झाडे कोसळल्याने खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान देवगड येथील घटनेतल्या बेपत्ता खलाशांसाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

14:03 May 17

नागरिकांनी घराबाहेर पडू नये जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे आवाहन

पालघर : वाऱ्याचा वेग व पाऊस वाढणार असून दुपारी भरती येणार असल्याचे हवामान विभागाने कळविले असल्याने पुढील तीन तास महत्त्वाचे असल्याने. कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये. तसेच कच्च्या घरात असल्यास नजीकच्या जिल्हा प्रशासनाने व्यावस्था केलेल्या नजीकच्या शाळेत आश्रय घ्यावा तसेच . विजेच्या खांबापासून व झाडांपासून नागरिकांनी दूर रहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी केले आहे.

14:03 May 17

तौत्के चक्रीवादळ हळूहळू उत्तरेकडे सरकू लागलं..

  • तौत्के चक्रीवादळ हाळूहाळू उत्तरेकडे सरकू लागलं आहे.
  • सध्या वादळ मुंबईच्या वायव्य भागाकडून गुजरातच्या दिशेनं सरकत आहे.
  • मुंबईपासून हे वादळ वायव्य दिशेस 142 किलोमीटर दूर आहे.
  • तर दिवपासून या वादळाचं अंतर 182 किलोमीटर दूर आहे.

14:02 May 17

पालिका आयुक्तांनी घेतला मुंबईच्या परिस्थितीचा आढावा

'तौत्के' या चक्रीवादळामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वेगवान वारे वाहत असून पाऊस देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर या अनुषंगाने महानगरपालिकेद्वारे केलेल्या विविध स्तरीय नियोजनाच्या अंमलबजावणीचा आढावाही त्यांनी घेतला.

14:02 May 17

अंधेरी परिसरात पाणी तुंबले

  • तौत्के चक्रीवादळामुळं मुंबईच्या अनेक रस्त्यावरपाणी साचले आहे.
  • अंधेरी मेट्रो स्टेशन परिसरात पाणी साचले आहे.
  • लॉकडाऊमुळं नागरिक आणि गाड्या रस्त्यावर नाहीत त्यामुळं ट्रॅफिकची समस्या नाही.

14:01 May 17

चक्रीवादळामुळे सीएसएमटी स्थानकांवरील छत उडाले; कसल्याही प्रकारची जीवितहानी नाही

मुंबई- 'तौत्के' चक्रीवादळामुळे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील छत उडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, या घटनेत कसल्याही प्रकाराची जीवितहानी झालेली नाही. रेल्वेच्या सतर्कतेमुळे छत उडालेल्या ठिकाणच्या खालील बाजूस प्रवाशांना मज्जाव करण्यासाठी सुरक्षा दोरी बांधण्यात आली.

14:00 May 17

ठाण्यात रात्रीपासून जोरदार पाऊस, आतापर्यंत वीस झाडं पडली

मुंबईप्रमाणे ठाण्यात देखील तोएक्ते चक्रीवादळाचा धोका हा संभवत आहे. सकाळपासूनच ठाण्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. काल रात्री पावसाची सुरुवात झाली असून आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात झाडांची देखील पडझड झाल्याचं आढळून आलेले आहे. ठाणे मध्ये प्रामुख्याने तेरा ठिकाणी झाडे पडून तीन ठिकाणी गाड्यांचे नुकसान झालेले आहे. ठाण्यातील सुरक्षा यंत्रणा या देखील वाढवण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये ठाणे टीडीआरएफ टीम सोबत अग्निशामक दल यांना देखील आता सतर्क करण्यात आलेले आहे. तोएक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये सुरक्षा यंत्रणा आता सज्ज झाले आहेत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून केले गेले आहे.
 

14:00 May 17

बॉम्बे हाय जवळील 273 कर्मचाऱ्यांच्या मदतीला भारतीय नौदलाचे जहाज रवाना

तौक्ते वादळाचा प्रभाव पहाता मुंबई जवळ असलेल्या अरबी समुद्रातील बॉम्बे हाय जवळ असलेल्या बार्ज पी 305 हिरा ऑइल फिल्ड्स च्या परिसरात काम करणाऱ्या 273 कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची या नौकेला मदत कार्यासाठी पाठवण्यात आलेला आहे. याबरोबरच भारतीय नौदलातर्फे आणखीन काही जहाजं भारताच्या पश्चिम समुद्रकिनारी तैनात करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलेला आहे.

12:56 May 17

मुंबईतील पावसाची दृश्ये..

मुंबईतील पावसाची दृश्ये..

12:52 May 17

मुंबईत तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे.

12:51 May 17

अपेक्षेपूर्वीच तौक्ते गुजरातच्या हद्दीत होणार दाखल; प्रशासन झाले सज्ज

अपेक्षेपूर्वीच तौक्ते गुजरातच्या हद्दीत होणार दाखल; प्रशासन झाले सज्ज

अहमदाबाद : यापूर्वी हवामान खात्याने तौक्ते चक्रीवादळ १८ तारखेला गुजरातच्या किनाऱ्यावर पोहोचण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, या वादळाने अचानक आपला वेग आणि दिशा बदलल्यामुळे आता आज सायंकाळपर्यंतच हे वादळ गुजरातच्या समुद्री हद्दीत पोहोचण्याची शक्यता दिसून येत आहे. मंगळवापर्यंत हे वादळ गुजरातच्या हद्दीतून पुढे जाईल. या पार्श्वभूमीवर राज्याच्या किनारी भागात एनडीआरएफ आणि एसडीआरएफची ५४ पथके तैनात करण्यात आली आहेत.

12:50 May 17

सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यातील 12 हजार 420 नागरिकांचे स्थलांतरण..

मुंबई- "तौक्ते" चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896 ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

12:34 May 17

तौक्तेचा मध्य रेल्वेनंतर हार्बरलाही फटका..

  • शिवडी ते जीटीबी रेल्वेस्थानकादरम्यान लोकलच्या ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड..
  • सध्या हार्बर लाईनवरील लोकल सेवा ठप्प..

12:34 May 17

मुंबईच्या तटीय परिसरात मदतीसाठी एनडीआरएफ टीम दाखल

मुंबईत जोरदार वार्‍यासह पावासाने मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पावसासंदर्भात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईच्या बऱ्याच भागात चक्रीवादळाचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. जोरदार वारे वाहत आहेत, तसेच मुसळधार पाऊस. वादळाच्या धोक्यामुळे मुंबईत ठीक ठिकाणी तात्पुरती निवारा घरे बांधली गेली आहेत. संरक्षणासाठी एनडीआरएफचे 3 आणि अग्निशमन दलाचे 6 पथक तैनात केले आहेत.

11:53 May 17

मुंबई - पाणी साचल्याने अंधेरी सबवे बंद

  • पावसाचे पाणी साचवल्यामुळे अंधेरीमधील सबवे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

11:43 May 17

कोचीजवळील समुद्रात अडकलेल्या १२ जणांना वाचवण्यात यश..

केरळ : कोचीच्या किनाऱ्यापासून ३५ सागरी किलोमीटर आत असणाऱ्या एका जहाजावरील १२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. आयएफबी जीजस असे या जहाजाचे नाव होते. इंडियन कोस्टगार्डच्या आर्यमान जहाजाने रविवारी रात्री ही कामगिरी केली.

11:37 May 17

गोव्यात 24 तासांपासून वीजपुरवठा खंडित, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांकडून मदतकार्य सुरु

पणजी (गोवा) -चक्रीवादळामुळे गोवा राज्यात अनेक ठीकाणी मागच्या 24 तासांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा देखील बंद पडली आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांनी मोठी मदत करत राज्यात ठिकठिकाणी पडलेली झाडे बाजूला केली आहेत. अजूनही मदतकार्य सुरु आहे. दरम्यान पावसाची रिपरिप अजूनही काही प्रमाणात सुरूच आहे. 

11:36 May 17

पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टीवरील वसई ते झाईपर्यंतच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासन सतर्क असून, या चक्रीवादळाचा परिणाम पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी तसेच ग्रामीण भागात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दुपारी बारा वाजेपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर दुपारी अडीच वाजताच्या सुमारास समुद्राला भरती येणार असल्यानेही उंच लाटा उसळणार असून वादळाचा परिणाम होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टीवरील वसई ते झाईपर्यंतच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

11:36 May 17

कोल्हापूर जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा; मोठे नुकसान

कोल्हापूर : चक्रीवादळाचा प्रभाव कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात काल दिवसभर जाणवला. जोरदार वारा आणि पावसाचा फटका कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये बसला. या वादळी पावसामुळे अनेक घरांचे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विजेचे खांब सुद्धा कोसळले आहेत. सुदैवानं कुठेही जीवितहानी झाली नाही.

11:10 May 17

उरणमध्ये भिंत अंगावर कोसळून महिला ठार

रायगड : तोक्ती चक्रीवादळाचा जोरदार प्रभाव हा पाहायला मिळत आहे. रात्री दोन वाजल्यापासून जिल्ह्यात वादळी वारे आणि मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या वादळात उरण बाजारपेठेत भिंत कोळसून एक महिला जागीच ठार झाली आहे. नीता रमेश नाईक रा अवेडा असे मयत महिलेचे नाव आहे. जिल्ह्यात अजून दोन जण जखमी झाले असून एका जनावरांचा मृत्यू झाला आहे. 8,399 घराचे नुकसान झाले आहे.

11:09 May 17

वादळी पावसामुळे कोयनेतील धबधबे कोसळू लागले

तौक्ते चक्रीवादळामुळे कराड आणि पाटण तालुक्यात पावसाचा जोर आहे. गेल्या चोवीस तासात कराड तालुक्यात 428 तर पाटण तालुक्यात 394 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. वादळी पावसामुळे ऐन उन्हाळ्यात  पाटणच्या कोयनानगरमधील धबधबे कोसळू लागले आहेत. कोयनेत पावसाळा सुरू झाल्यासारखं वाटत आहे. 

11:08 May 17

मुंबईत कुलाबा येथे १७.४ मिमी तर सांताक्रुझ येथे ११.९ मिमी पावसाची नोंद, १८२ झाडे फांद्या कोसळल्या

मुंबईत कुलाबा येथे १७.४ मिमी तर सांताक्रुझ येथे ११.९ मिमी पावसाची नोंद, १८२ झाडे फांद्या कोसळल्या
  • मुंबईत कुलाबा - १७.४ मिमी सांताक्रुझ - ११.९ मिमी पावसाची नोंद
  • कुलाबा वेधशाळेने पुढिल २४ तासांकरिता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आकाश सर्वसाधारणतः ढगाळ राहील. मध्यम पावसासोबत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.
  • एकूण १८२ ठिकाणी झाडे / फांद्या पडल्याच्या तक्रारी.
  • एकूण ६ ठिकाणी घराचे भिंतीचे भाग पडल्याच्या तक्रारी.

10:54 May 17

पश्चिम किनारपट्टीवरील तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांकडून मंत्रालय नियंत्रण कक्षातून आढावा..

मुंबई - राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

10:54 May 17

  • दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस सोसाट्याचा वारा वाहत असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

10:48 May 17

रायगडमधील नुकसानाचा आढावा..

  • जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे आतापर्यंत 8,399 घरांचे अर्धवट नुकसान.
  • 1 मानवी दुर्घटना, 2 जखमी..
  • 1 जनावरांचा मृत्यू..
  • 23.42 मिमी पाऊस..
  • 2,263 कुटुंबे / 8,383 लोक स्थलांतरित..

10:47 May 17

वाऱ्यामुळे बीकेसी कोविट सेंटरचे नुकसान; रुग्णांचे स्थलांतर

वाऱ्यामुळे बीकेसी कोविड सेंटरच्या कंपाऊडचे नुकसान झाले असून; 182 रुग्णांना सुरक्षितपणे इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लवकरच रुग्णसेवा पुन्हा सुरू करू, अशी माहिती डॉ. राजेश ढेरे यांनी दिली आहे.

10:46 May 17

बांद्रा-वरळी सीलिंक पूर्णपणे बंद..

मुंबईतील बांद्रा-वरळी सी-लिंक पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी वाहतुकीसाठी दुसऱ्या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

10:45 May 17

मुंबई उपनगरातील पाऊस वाढला; वाहतूक मात्र सुरळीत..

मुंबई उपनगरांमध्ये  मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक ही सद्यस्थितीमध्ये सुरळीत प्रमाणात सुरू आहे वाहतूक व्यवस्थेवर ती कोणताही परिणाम सध्या वादळी वाऱ्यांमुळे झालेला नाही..

10:42 May 17

रायगडातील 7 हजार 866 नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण

रायगड : "तौक्ते" चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या 7 हजार 866 नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण झाले असून, तालुकानिहाय स्थलांतरित लोकांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे -

  • अलिबाग- 605
  • पेण- 193
  • मुरुड- 1,067
  • पनवेल- 168
  • उरण-451
  • कर्जत- 45
  • खालापूर- 176
  • माणगाव- 1,309
  • रोहा- 523
  • सुधागड- 165
  • तळा- 135
  • महाड- 1,080
  • पोलादपूर- 295
  • म्हसळा- 496
  • श्रीवर्धन- 1158

या एकूण 7 हजार 866 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

10:33 May 17

तौक्ते वादळाचा विमान सेवेला फटका

  • तौक्ते वादळाचा विमान सेवेला फटका..
  • मुंबई विमानातळावरील सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व विमान सेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत..

10:32 May 17

नाशिक जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात..

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम नाशिक शहरासह जिल्ह्याच्या बऱ्याच भागांमध्ये दिसून आला व शहरातील बहुतेक भागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या,आणि ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळून पडल्या तर रस्त्यावर काही होर्डिंग देखील पडल्याच्या घटना घडल्या, दरम्यान पोलिसांनी नाकेबंदी दरम्यान रस्त्यावर उभारलेले कापडी मंडप देखील उडुन गेले.

10:11 May 17

मुंबई : चक्रीवादळामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

  • तौक्ते वादळाचा मध्य रेल्वेला फटका.
  • विक्रोळी ते घाटकोपर दरम्यान रेल्वे रुळावर झाड पडल्याने सीएसटी कडून ठाण्याकडे जाणारी स्लो-मार्गावरील रेल्वे सेवा बंद.
  • धीम्या मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या जलद मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत.

10:07 May 17

रत्नागिरीत नौका एकमेकांवर आदळल्याने मोठे नुकसान; तर भिंत पडल्याने गाड्यांचे नुकसान

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाने मिरकरवाडा परिसराला दणका दिला आहे. मिरकरवाडा जेटीवर उभ्या नौकाना वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. जोरदार वाऱ्यामुळे नौका एकमेकांवर आदळत होत्या. नौका मोठ्याने एकमेकांवर आदळून नौकांचे नुकसान झाले. रात्रभर हा प्रकार सुरू होता. भीतीपोटी मच्छीमारांनी रात्रभर जागून काढली.

तर मिरकरवाडा पांढरा समुद्र येथील कांचन ओशियन व्ह्यू इमारतीसमोरील भिंत कोसळली. या भिंतीखाली अनेक गाड्या दबल्या गेल्याने नुकसान झाले. भिंत कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक सोहेल साखरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मच्छीमारांच्या मदतीसाठी रात्र जागून काढली.

09:50 May 17

तौक्तेची भीषणता वाढली; आता 'अत्यंत तीव्र' प्रकारात समावेश

दीवकडे वाटचाल सुरू असतानाच तौक्ते चक्रीवादळाने आणखी भीषण रुप धारण केले आहे. या वादळाचा प्रकार आता 'तीव्र चक्रीवादळ' वरुन 'अत्यंत तीव्र चक्रीवादळ' असा झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. या पार्श्वभूमीवर गुजरात आणि दीवच्या किनारी भागाला इशारा देण्यात आला आहे.

09:48 May 17

चक्रीवादळ दीवपासून ३६० किलोमीटरवर..

हे चक्रीवादळ सध्या दीवच्या जवळ पोहोचले असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दीवपासून हे ३६० किलोमीटर दूर असून, वादळाच्या मध्यापासून याचा व्यास ४२ किलोमीटर एवढा दीर्घ असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

09:45 May 17

तौक्तेच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या जवानांच्या वाहतुकीसाठी वायुसेनेची मदत..

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे जवान आणि एचएडीआर साहित्याच्या वाहतुकीसाठी वायुदलाच्या दोन विमानांना पाचारण करण्यात आले आहे. पुणे आणि विजयवाडामधून कालच हे जवान अहमदाबादला गेले असून; कोलकातामधून आणखी जवान अहमदाबादसाठी रवाना होत आहेत.

09:44 May 17

मुंबईतील परिस्थितीचा आढावा..

मुंबईतील परिस्थितीचा आढावा..

तौक्ते चक्रीवादळ मुंबईच्या समुद्री हद्दीत दाखल झाल्यामुळे सकाळपासूनच मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. शहरातील परिस्थितीचा आढावा घेतलाय, आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांनी..

09:22 May 17

लांजा तालुक्यातील वाकेड इथं महामार्गावरील मोरी खचली

लांजा तालुक्यातील वाकेड इथं महामार्गावरील मोरी खचली..
  • मुसळधार पावसाचा फटका मुंबई-गोवा महामार्गाला..
  • लांजा तालुक्यातील वाकेड इथ महामार्गावरील मोरी खचली..
  • मोरी खचल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा..
  • मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटातील मोरी खचल्याने एकेरी वाहतूक..
  • महामार्ग कामाच्या ठेकेदाराकडून उपाययोजना नसल्याने वाहतूकदार नाराज..

09:20 May 17

रत्नागिरी जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरूच

तौक्ते चक्रीवादळाचे परिणाम अद्यापही कोकण किनारपट्टीवर दिसत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसत आहे. रात्रभर हीच स्थिती आहे. रात्रभरापासून रत्नागिरी किनारपट्टीवर वेगवान वारे वाहताहेत. तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं पडल्याने नुकसान झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज अद्यापही गायब आहे.

09:10 May 17

तौक्ते वादळ: मोनो बंद; मेट्रो सुरळीत..

मुंबई :अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाचा परिमाण सकाळपासून मुंबईत सुरू झाला आहे. मुंबईत वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. मात्र त्याचवेळी मुंबईची तिसरी लाईफलाइन अर्थात मेट्रो 1 (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर) सेवा तूर्तास सुरळीत सुरू आहे. तर मोनो रेल (चेंबूर-जेकब सर्कल) सेवा बंद करण्यात आली असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सांगण्यात आले आहे.

09:09 May 17

उडूपीमध्ये बोटीवर अडकले नऊ जण..

कर्नाटकच्या उडपीपासून जवळ अरबी समुद्रात एका बोटीमध्ये नऊ जण अडकल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. या सर्वांना वाचवण्यासाठी आयएनएस वराहच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. वादळी वाऱ्यामुळे हे बचावकार्य सध्या थांबवले आहे. लवकरच हे पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

09:08 May 17

महाराष्ट्राच्या ४,५२६; तर गुजरातच्या २,२५८ बोटी किनारी परतल्या..

महाराष्ट्राच्या ४,५२६; तर गुजरातच्या २,२५८ बोटी किनारी परतल्या..

आतापर्यंत महाराष्ट्रातील ४,५२६ आणि गुजरातच्या २,२५८ मच्छिमार नौका सुखरुपपणे किनारी पोहोचल्या असल्याची माहिती इंडियन कोस्ट गार्डने दिली आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर या बोटींना बंदरांमध्ये परतण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

08:17 May 17

मुंबईत पुढील तीन तासांत वादळी पावसाचा इशारा

मुंबईत पुढील तीन तासांत वादळी पावसाचा इशारा

मुंबई - अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या तौत्के चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत शनिवारी रात्री व रविवारी काही भागात वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. वादळामुळे मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरीत पुढील तीन तासांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यादरम्यान 75 ते 85 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहतील इसा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

08:14 May 17

तौक्ते चक्रीवादळ; वांद्रे - वरळी सी लिंकवर मुसळधार पाऊस

तौक्ते चक्रीवादळ; वांद्रे - वरळी सी लिंकवर मुसळधार पाऊस

मुंबई -अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या तौत्के चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबईतील काही भागात वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. वांद्रे-वरळी सी लिंकवरही मुसळधार पाऊस सुरू आहे. वरळी सी लिंकवरून हे ताजे दृष्य.

08:13 May 17

गोव्याला चक्रीवादळाचा मोठा फटका, दोघांचा मृत्यू ; २०० घरांचे नुकसान

गोव्याला चक्रीवादळाचा मोठा फटका, दोघांचा मृत्यू ; २०० घरांचे नुकसान

पणजी (गोवा)- गोव्यात दोन मृत्यूची नोंद झाली आहे. ५०० हून अधिक झाडे कोसळली आहेत. सुमारे १०० घरांचे मोठे आणि १०० घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. तर वीजपुरवठा खंडित झाला असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. पणजीत १०८ मिली पावसाची नोंद झाली आहे. दुपारी चारनंतर राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी वाऱ्याचा वेग कायम आहे. हे वादळ पणजीपासून अवघ्या १००.६ किमी अंतरावरून गेले आहे.  

08:13 May 17

सिंधुदुर्गात तौक्तेचा कहर.. १४४ कुटुंबांचे स्थलांतर, ४४७ घरांची पडझड

सिंधुदुर्गात तौक्तेचा कहर.. १४४ कुटुंबांचे स्थलांतर, ४४७ घरांची पडझड

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टीवरच्या एकूण 144 कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले. तर आहे. 447 घरांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जोरदार पाऊस अजूनही सुरु आहे. तसेच जिल्ह्यात सुमारे 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. मालवण तालुक्यातील आचरा जामडूल, गाउडवाडी भागात उधाणाचे पाणी अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित झाला असून तो सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

08:12 May 17

रायगड जिल्हा प्रशासन सतर्क, 2,254 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

रायगड - तौक्ते चक्रीवादळ रायगड जिल्ह्यात पहाटे दाखल होणार असल्याची शक्यता आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणारे तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या 2,254 नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सुस्थळी हलविले आहे. रात्रीत अजून काही हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याबाबत प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. वादळाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती निवारण कक्षात वॉर रूम तयार करून यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे. 

08:12 May 17

तौक्ते चक्रीवादळ येत्या २४ तासात आणखी तीव्र होणार

मुंबई- तौक्ते चक्रीवादळ येत्या २४ तासांत आणखी तीव्र होणार आहे. हे वादळ उत्तर, वायव्ये दिशेकडे मार्गक्रमण करत १७ मे रोजी संध्याकाळी गुजरातच्या किनारपट्टीला धडकणार आहे. पोरबंदर व महुआ येथे १८ मे रोडी पहाटेच्या सुमारास पोहोचेल. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.  

08:02 May 17

तौक्ते चक्रीवादळाचे लाईव्ह अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

मुंबई- अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या तौत्के चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत शनिवारी रात्री व रविवारी काही भागात वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात वादळाची तीव्रता वाढल्याने येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे येथे वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सज्ज झाली असून आवश्यक यंत्रणा तैनात केली आहे.

Last Updated : May 17, 2021, 10:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details