नवी दिल्ली:दसऱ्याच्या आधिच अनेक भागातील पाऊस संपतो पण सध्या भारतातील अनेक भागात मान्सून जोरात आहे. यातच आता नोरू चक्रीवादळामुळे मान्सूनचा मुक्काम लांबत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. नैऋत्य मान्सून सक्रिय झाल्यामुळे अनेक राज्यांत अजूनही पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. नोरु वादळाचा परिणाम भारताच्या हवामानावर दिसत आहे.
बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुपर चक्रीवादळ नोरूमुळे बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक भागात हवामानात बदल झाला आहे. सध्या देशातील अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, मध्य प्रदेश, बिहारसह अनेक शेजारील राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान आणि हरियाणाच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.