नवी दिल्ली :यावर्षीच्या पहिल्या चक्री वादळात 'मोचा' वादळाची सुरूवात झाली आहे. याबाबत भारतीय हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. 2022 मध्ये असानीसारखा कहर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, अंदमान-निकोबारमध्ये ८ मे रोजी पाऊस पडेल. यासोबतच इतर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या दरम्यान ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्याच वेळी, 10 मे रोजी वाऱ्याचा वेग ताशी 80 ते 90 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. या वादळाचा प्रभाव अंदमान निकोबार बेटांवर अधिक दिसून येईल असाही अंदाज वर्तवला आहे.
पर्यटकांना सतर्कतेचा इशारा : IMD ने आधीच मच्छिमार, लहान जहाजे, बोटी आणि पर्यटकांना आग्नेय बंगालच्या उपसागरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय 8 ते 11 मे पर्यंत पर्यटन, शिपिंग आणि इतर कामांचे नियमन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर तेथे येणाऱ्या पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, मच्छीमारांना समुद्र किनाऱ्यापासून दूर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.