चेन्नई (तामिळनाडू) - 'मंदौस' चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या किनारी भागात मुसळधार पाऊस पडत आहे. जोरदार वारा आणि वादळामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. येथील 13 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे 3 आंतरराष्ट्रीय विमानांसह 16 उड्डाणे रद्द करावी लागली. ( Mandous Cyclonic storm In Mamallapuram) परिस्थिती लक्षात घेऊन चेन्नईत एनडीआरएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील काही तास तामिळनाडूसाठी धोक्याचे असतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाच्या 12 तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सुमारे 400 कर्मचारी आधीच कावेरी डेल्टा भागांसह किनारपट्टीच्या भागात तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
सर्वाधिक परिणाम तामिळनाडूत -यावादळामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. चक्रीवादळाचा इशारा दिल्यानंतर पुद्दुचेरी आणि कराईकल भागातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना शुक्रवार आणि शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मंदौस चक्रीवादळाचा तीन राज्यांतील लोकांना धोका आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम तामिळनाडूत दिसून येईल. अशा परिस्थितीत विल्लुपुरम जिल्ह्यात 12 ठिकाणी मदत केंद्र उभारण्यात आली आहेत. मदत आणि बचाव कार्यासाठी 16,000 पोलीस आणि 1,500 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर राज्यात अनेक आपत्ती व्यवस्थापन पथकेही तैनात आहेत. दरम्यान, आज तामिळनाडूतील तीन जिल्ह्यांमध्ये चेंगलपट्टू, विल्लुपुरम आणि कांचीपुरममध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. अंदाजानुसार, मंदौस चक्रीवादळामुळे बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होऊ शकते. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या उत्तर किनारपट्टी भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसाची शक्यता - प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, रानीपेट्टई, वेल्लोर, तिरुपत्तूर, कृष्णगिरी, धर्मपुरी, तिरुवन्नमलाई, कल्लाकुरीची, अरियालूर, पेरांबलूर, तिरुचिरापल्ली, करूर, इरोड, सेलम येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तमिळनाडूतील नमक्कल, थिरुपूर, कोईम्बतूर, निलगिरी, दिंडीगुल, थेनी, मदुराई, शिवगंगाई, विरुधुनगर आणि तेनकासी जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तासांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रावर काही परिणाम - बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ सध्या आग्नेयेकडून वायव्येकडे जात आहे. त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर विशेष असा काही परिणाम होण्याची शक्यता नाही. याबाबत हवामान खात्याकडून माहिती देण्यात आली आहे. चक्रीवादळाचा विशेष परिणाम हा महाराष्ट्रातील दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागांत काही ठिकाणी ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत तुरळक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही पाऊस होणार आहे. अनेक ठिकाणी आकाश अंशत: ढगाळ राहील आणि पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्र ओलांडून थेट मध्य प्रदेशपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
यापूर्वी असे चक्रीवादळ कधी आले होते -हवामान विभागाचे प्रमुख बालचंद्रन यांनी सांगितले की, चेन्नई आणि पुद्दुचेरी दरम्यान 1891 ते 2021 या 130 वर्षांत 12 चक्रीवादळे आली आहेत. "जर हे चक्रीवादळ मामल्लापुरमजवळील किनारपट्टी ओलांडले तर (चेन्नई आणि पुद्दुचेरी दरम्यान) किनारपट्टी ओलांडणारे हे 13 वे चक्रीवादळ असेल. अशी माहितीही बालचंद्रन यांनी यावेळी दिली आहे.
कडाक्याची थंडी –राज्याच्या बहुतांश भागात पुन्हा रात्रीचे किमान तापमान सारसरीच्या तुलनेत कमी झाल्याने गारवा निर्माण झाला आहे. विदर्भ, मराठवाड्यात बहुतांश भागात तापमानाचा पारा १० अंशांखाली गेल्याने या भागांत थंडीचा कडाका वाढला आहे. औरंगाबाद येथे शुक्रवारी राज्यातील नीचांकी ७.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. विदर्भातील गोंदिया येथे ८.८, तर नागपूर येथे ९.९ अंश नीचांकी किमान तापमान नोंदविले गेले. विदर्भात इतर भागांत १० ते ११ अंशांवर तापमान आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली आदी भागांतही तापमान घटले आहे. तापमानातील ही घट आणखी एक-दोन दिवस कायम राहणार आहे. त्यानंतर पावसाळी वातावरणामुळे तापमानात पुन्हा वाढ होणार आहे.
विदर्भात गारवा– राज्यात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत रात्रीच्या तापमानात काही प्रमाणात घट झाली असली, तरी विदर्भ वगळता सर्वत्र तापमान सरासरीच्या पुढे आहे. त्यामुळे विदर्भात सध्या हलका गारवा आहे. गोंदिया येथे गुरुवारी राज्यातील नीचांकी १०.२ अंश किमान तापमानाची नोंद झाली. चक्रीवादळाच्या परिणामाने सध्या काही भागांत अंशत: ढगाळ स्थिती निर्माण होत असल्याने दिवसाच्या कमाल तापमानात मात्र घट होत आहे. कमाल तापमान सर्वत्र सरासरीखाली आले आहे. गेल्या तीनचार दिवसांत मुंबईसह कोकणात उन्हाचा चटका वाढून कमाल तापमान देशात उच्चांकी ठरले होते. या विभागातही आता तापमानात घट होत आहे.