मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभागाने चक्रीवादळ बिपरजॉय पुढील 36 तासात आणखी तीव्र होईल अशी शक्यता वर्तवली आहे. हे चक्रीवादळ शनिवारी ईशान्येकडे सरकणार आहे. IMD ने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, बिपरजॉय हे तीव्र चक्रीवादळ 9 जून रोजी 23:30 वाजता पूर्व-मध्य अरबी समुद्रात पोहोचले. हे चक्रीवादळ 2 दिवसांत उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकणार आहे. या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये,अशी सूचना हवामान खात्याने दिली आहे.
या चार राज्यंमध्ये प्रभाव दिसरणार : बिपरजॉयचा प्रभाव चार राज्यांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्राच्या जवळपासच्या भागात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या चार राज्यांमध्ये चक्रीवादळाचे परिणाम दिसणार असून दक्षता घेण्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टीपासून मच्छिमारांना दूर राहण्याचा सांगण्यात आले आहे.
समुद्रकिनारा पर्यटकांसाठी १४ जूनपर्यंत बंद :बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गुजरातमधील वलसाडला लागून असलेल्या अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर उंच लाटा उसळल्या आहेत. खबरदारी म्हणून तेथील समुद्रकिनारे हे १४ जूनपर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. वलसाडचे तहसीलदार टीसी पटेल यांनी सांगितले की, मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. जे मासेमारी करणारे समुद्रात गेले होते त्यांना परत बोलावण्यात आले आहे. दरम्यान गरज वाटली तर समुद्रकिनारी असलेल्या गावातील लोकांना स्थलांतरित केले जाईल. त्यांच्यासाठी निवारागृहे तयार करण्यात आली आहेत. तेथील समुद्रकिनारा पर्यटकांसाठी १४ जूनपर्यंत बंद करण्यात आली आहेत.