अहमदाबाद :अरबी समुद्रातून निर्माण झालेले चक्रीवादळ 'बिपरजॉय' गुजरातमधील कच्छपासून केवळ 290 किमी अंतरावर आहे. चक्रीवादळामुळे समुद्राच्या प्रचंड लाटा किनाऱ्यावर आदळत आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार हाय अलर्टवर आहे. आतापर्यंत 47,113 लोकांना किनारी भागातील गावांमधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मदत आयुक्त आलोक कुमार पांडे यांनी सांगितले की, बचाव, वीज, रस्ता, मोबाईल टॉवर आदींबाबत कृती आराखडा तयार आहे.
लोकांना सुरक्षित स्थळी हलवणे सुरु : आलोक पांडे यांनी सांगितले की, चक्रीवादळाचा प्रभाव द्वारका, खंभलिया आणि मांडवी येथे दिसू लागला आहे. गेल्या 24 तासात जोरदार वाऱ्यासह 90 मिमी पर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. जुनागडमधील 4,462, कच्छमधील 17,739, जामनगरमधील 8,542, पोरबंदरमधील 3,469, द्वारकामधील 4,863, मोरबीमधील 1,936 आणि राजकोटमधील 4,497 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
आठ जिल्ह्यांमध्ये NDRF-SDRF टीम तैनात : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपत्तीला तोंड देण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. राजकोटमध्ये राखीव असलेल्या एनडीआरएफच्या दोन तुकड्या कच्छला पाठवण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची टीम सध्या लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याबाबत आणि वादळाच्या काळात काय करावे आणि काय करू नये, याची माहिती देत आहे. सध्या आठ जिल्ह्यांमध्ये NDRF आणि SDRF च्या एकूण 18 टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय गरज भासल्यास पंजाब आणि तामिळनाडूमधून आणखी टीम्स विमानाने पाठवल्या जातील.