अहमदाबाद : बिपरजॉय चक्रीवादळ आज दुपारी 4 ते 8 या वेळेत गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर धडकणार आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागातील जवान सतर्क झाले आहेत. मोठ्या प्रमाणात स्थलांतरण मोहीम सुरू झाली आहे. राज्यातील पश्चिम विभागातील आपत्ती व्यवस्थापन कर्मचार्यांची तैनाती सुरू आहे. चक्रीवादळ संध्याकाळी 5.30 पर्यंत जमिनीवर धडकणार असल्याचा असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ पहाटे 2.30 वाजता जाखाऊ बंदराच्या पश्चिम नैऋत्येस सुमारे 200 किमी अंतरावर असल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
जीवितहानी होणार नाही, याची काळजी :गुरुवारी चक्रीवादळ किनारपट्टीवर आदळल्यावर कोणतीही जीवितहानी होणार नाही यासाठी अधिकाऱ्यांनी किनारी भागात तयारी आणि निर्वासन कार्ये पुन्हा सुरू केले आहे. राज्य सरकारने आठ किनारी जिल्ह्यांतील असुरक्षित भागातील 74 हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
या प्रदेशाला आहे सतर्कतेचा इशारा :चक्रीवादळ कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ बंदराजवळ जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच सौराष्ट्र-कच्छ प्रदेशातील काही भागात जोरदार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. हवामान खात्याने गुजरात, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा, दमण दीव, लक्षद्वीप, दादर आणि नागराजुन हवेलीसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अतिमुसळधार पावसाची शक्यता :चक्रीवादळामुळे बुधवारी गुजरातच्या किनारी भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पाडला. काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीसह पावसाची तीव्रता वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुरुवारी कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगरमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
भारतीय नौदलाची जहाजे तयार :भारतीय नौदलाने बुधवारी सांगितले की त्यांनी HADR सुसज्ज चार जहाजे तैनात केली आहेत. ही जहाजे आपत्तीला तोंड देण्यास सज्ज आहेत. याशिवाय, पोरबंदर आणि ओखा या दोन्ही ठिकाणी 5 मदत पथके तैनात आहेत. वालसुरा येथे 15 मदत पथके नागरी अधिकाऱ्यांना मदत आणि समर्थन देण्यासाठी तयार आहेत. शिवाय, गोव्यातील INS हंसा आणि मुंबईतील INS शिक्रा येथे हेलिकॉप्टर गुजरातला तत्काळ वाहतुकीसाठी सज्ज असल्याची माहितीही नौदलाने दिली आहे.
प्रशासन झाले सज्ज : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्रीय स्तरावर, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चक्रीवादळाचा प्रभाव हाताळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची स्वतंत्रपणे तपासणी केली. बुधवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांच्या कालावधीत विविध जिल्ह्यांतील नऊ तालुक्यांमध्ये लक्षणीय पाऊस झाला.
उत्तर-पूर्वेकडे जाईल बिपरजॉय चक्रीवादळ :भारतीय हवामान विभाग (IMD) ने बिपरजॉय आपला मार्ग बदलून कच्छ आणि सौराष्ट्रच्या दिशेने उत्तर-पूर्वेकडे जाईल, असा अंदाज वर्तवला आहे. वाऱ्याचा वेग 125-135 किमी प्रतितास आणि 145 किमी प्रतितास वेगाच्या वादळासह अतिशय तीव्र चक्रीवादळ जमिनीवर धडकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गुजरात सरकारने कच्छ प्रदेशावर लक्ष केंद्रित करून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू केले आहेत. या परिसरात चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. किनारपट्टीच्या 10 किमी परिघात राहणाऱ्या लोकांना तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये स्थलांतरित केले जात आहे.
प्रमुख मंदिरे आज बंद राहणार :जाखाऊ बंदराजवळ बिपरजॉय चक्रीवादळाचा अपेक्षित तडाखा पाहता, देवभूमी द्वारका जिल्ह्यातील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. द्वारकाचे उपविभागीय दंडाधिकारी आणि द्वारकाधीश मंदिर ट्रस्टचे प्रशासक पार्थ तलसानिया यांनी गुरुवारी मंदिर भाविकांसाठी बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. चक्रीवादळाचा इशारा लक्षात घेऊन लोकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भाविकांना मंदिराच्या आवारात प्रवेश दिला जाणार नसला तरी, दैनंदिन विधी पुजाऱ्यांद्वारे केले जातील. भाविकांना ते मंदिराच्या वेबसाइटवर तसेच सोशल मीडिया हँडलवर थेट पाहू शकतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. गीर सोमनाथ जिल्ह्यातील प्रसिद्ध सोमनाथ मंदिर गुरुवारी खुले राहणार आहे. परंतु त्याचे व्यवस्थापन करणार्या ट्रस्टने भाविकांना भेट देऊ नये असे आवाहन केले आहे.
हेही वाचा -
- Cyclone Beeperjoy: 'बिपरजॉय' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गेटवे परिसरात सुरक्षा तैनात
- Cyclone Biparjoy : बिपरजॉय कच्छपासून 290 किमी दूर; जाणून घ्या अपडेट