राजस्थान :मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका बसू शकणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांच्या बचाव आणि मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने सज्ज राहावे, अशा सूचना दिल्या आहेत. एसडीआरएफ, नागरी संरक्षण, स्वयंसेवक आणि आप मित्र यांचा समावेश करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात यावी, असे त्यांनी सूचवले आहे. वादळप्रवण भागात अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावे आणि गरज असेल तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन सर्वसामान्यांना करण्यात आले आहे.
सर्वसामान्यांना प्रशासनाकडून आवाहन : मोठ्या आणि जुन्या झाडांखाली आसरा घेऊ नका. 16 ते 18 जून दरम्यान कोणत्याही प्रकारच्या पर्यटन आणि साहसी उपक्रमात सहभागी होऊ नका. मुसळधार पावसापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी, जनावरे चारणाऱ्या पशुपालकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन जनावरे बाहेर काढू नयेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षाला कळवा.
'या' खबरदारी लक्षात ठेवा :जोरदार वारा आणि गडगडाटाच्या वेळी घरातच रहा. जोरदार वारा, पाऊस आणि विजांच्या कडकडाटात मोठ्या झाडांखाली आणि कच्च्या घरांचा आसरा घेणे टाळा, कच्च्या भिंतीजवळ उभे राहू नका. वादळात विजेच्या तारा तुटण्याची शक्यता आहे आणि विजेचे खांब पडू शकतात, त्यामुळे काळजी घ्या. जनावरांना मोकळ्या आवारात ठेवा आणि त्यांना खुंटीला बांधू नका. दुचाकी वाहने विजेच्या खांबाखाली आणि जवळ पार्क करू नका. टिन शेड असलेल्या घरांचे दरवाजे बंद ठेवा. मोठे होर्डिंग असलेल्या ठिकाणांपासून दूर राहा आणि विजेचे खांब, तारा, ट्रान्सफॉर्मर इत्यादीपासून पुरेसे अंतर ठेवा. जोरदार प्रवाहात वाहनातून उतरू नका आणि आपत्कालीन परिस्थितीत टॉर्च घेऊन जा. रेन कोट आणि छत्र्या वापरा. बॅटरीवर चालणारे मोबाईल, इन्व्हर्टर इत्यादी पूर्णपणे चार्ज करून ठेवा.
हेही वाचा :
- Cyclone Biperjoy: मुंबईच्या समुद्रातून उसळू लागल्या उंच लाटा; सर्व चौपाट्यांवर सुरक्षा रक्षक तैनात
- Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाने मुंबईतील समुद्र खवळला.. लाटांनी घेतले रौद्ररुप
- Cyclone Biparjoy : बिपरजॉय कच्छपासून 290 किमी दूर; जाणून घ्या अपडेट