रीवा Cruelty With Man : मध्यप्रदेशातील रीवा विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संकल्प व्यसनमुक्ती केंद्रातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यसनमुक्ती केंद्रातील संचालक आणि कर्मचाऱ्यांनी क्रुरपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. एका तरुणाच्या गुप्तांगत गॅस लायटर टाकून त्याला गंभीर जखमी केले. त्यामुळं त्याचे आतडेही फाटले. त्यानंतर पीडित तरुणाच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागल्याने नशामुक्त केंद्राचे संचालक आणि कर्मचारी घाबरले. त्यांनी घाईघाईनं त्याला संजय गांधी रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, घरच्यांना ही बाब कळताच संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.
संकल्प व्यसनमुक्ती केंद्रात तरुणावर अत्याचार : गढवा येथील रहिवासी करण (नाव बदलले आहे) हा व्यसन करायचा. व्यसनमुक्तीसाठी त्याच्या कुटुंबीयांनी त्याला 25 जुलै 2021 रोजी संकल्प व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलं होतं. व्यसनमुक्ती केंद्र संचालक करणच्या कुटुंबीयांकडून महिन्याला 15 ते 18 हजार रुपये वसूल करायचे. मात्र, पीडित करणची पत्नी जेव्हा त्याला भेटायला गेली तेव्हा तिला पतीला भेटण्यापासून रोखले.
पीडित तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर प्रकरण आलं उघडकीस :28 ऑक्टोबर 2023 रोजी करणला संजय गांधी रुग्णालयात दाखल केल्यानंतर व्यसनमुक्ती केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी करणच्या पत्नीला फोन केला. ते म्हणाले की, 'करणच्या पोटात दुखत आहे, त्यामुळं आम्ही त्यांला संजय गांधी रुग्णालयात दाखल केलंय. त्यांनंतर करणचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले आणि करणच्या पोटात मोठी जखम असल्याचं पाहून त्यांनी डॉक्टरांना विचारले. डॉक्टरांनी सांगितले की, करणचे आतडे फाटले आहेत. कोणीतरी धारदार वस्तूने त्याच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत केली आहे.