रांची - झारखंडमध्ये केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या (सीआरपीएफ) जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. लातेहार जिल्ह्यात आज (शनिवार) ही घटना घडली. सीआरपीएफ जवानाने आत्महत्या करून जीवन संपवल्याची ही मागील ९ दिवसांतील दुसरी घटना आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत आनंद यांनी वृत्तास दुजोरा दिला आहे.
१३३ बटालीयनमध्ये होता कार्यरत
जिल्ह्यातील मनिका येथील १३३ बटालीयन कॅम्पच्या गार्डरुममध्ये दुपारच्या वेळी जवानाने गोळी झाडून आत्महत्या केली. प्रवीण मोचहारी असे या जवानाचे नाव असून तो ३५ वर्षांचा होता. तो मूळचा आसामच्या बक्सा जिल्ह्यातील होता. सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडून त्याने आत्महत्या केली. हा जवान नुकताच सुट्टीवरून माघारी आल्याची माहिती मिळाली आहे.
कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज
कौटुंबिक कारणामुळे जवानाने आत्महत्या केल्याचे प्राथमिक दृष्या दिसत असून तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधी १७ डिसेंबरला २१४ बटालीयनमधील बिहारच्या जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. तो बिहारमधील नवादा जिल्ह्यातील होता. मागील ९ दिवसांतील ही दुसरी आत्महत्या आहे.