जयपूर :राजस्थानच्या अजमेरमध्ये असणाऱ्या मित्तल रुग्णालयातील ऑक्सिजन संपत आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयातील तब्बल ९० रुग्णांच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज सकाळीपर्यंतचाच ऑक्सिजन शिल्लक असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे प्रशासनाने रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना दुसरीकडे नेण्याची विनंती केली आहे.
रुग्णालयाचा कथित मेसेज सोशल मीडियावर व्हायरल..
अजमेरमध्ये सध्या जवळपास सर्वच सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजन बेड भरलेले आहेत. अशात मित्तल रुग्णालयाला सकाळीपर्यंत ऑक्सिजन मिळाला नाही, तर या सर्व रुग्णांनी कुठे जायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रुग्णालय प्रशासनाने हात वर केल्यामुळे नातेवाईकांचाही धीर खचला आहे. या सर्व नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाला लवकरात लवकर ऑक्सिजन देण्याची मागणी केली आहे. या नातेवाईकांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यासोबतच रुग्णालय प्रशासनाने हतबलपणे केलेला एक व्हॉट्सअप मेसेजही सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.