गिरिडीह(झारखंड) - गिरिडीह जिल्ह्यातील सारिया पोलीस स्टेशन परिसरात माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथे एका महिलेला मारहाण करून झाडाला बांधून ठेवण्यात आले होते. एवढेच नाही तर महिलेचे कपडेही फाडले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी महिलेची सुटका केली आहे. तसेच सध्या या महिलेवर रु्ग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरोपींना अटक - पीडितेने पोलिसांना आरोपींची नावेही सांगितली आहेत. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणातील आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मात्र, याबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समजू शकलेली नाही.
मारहाण करत महिलेचे कपडे फाडले - सारिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील महिलेला अज्ञात व्यक्तीने फोन करून रात्री घराबाहेर बोलावल्याचे सांगण्यात येत आहे. त्यनंतर पीडित महिला घराबाहेर आली असता बाहेर दोन तरुण उभे असल्याचे तिला दिसले. त्यानंतर तरुणांनी महिलेला जबरदस्ती करत दुचाकीवर बसवले आणि नंतर गावापासून दूर निर्जनस्थळी नेले. यावेळी तरुणांनी महिलेला बेदम मारहाण केली आणि नंतर तिला झाडाला बांधून ठेवले. महिला रात्रभर झाडाला बांधून राहिल्याचे सांगण्यात येत आहे.