संसद सुरक्षा भंग प्रकरणी दिल्लीहून विशेष पथक पोहोचले लखनौला लखनौ Parliament Security Breach :13 डिसेंबर रोजी संसदेची सुरक्षा भंग झाल्याचं प्रकरण संवेदनशील असल्यानं याचा सखोल तपास केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर अटकेत असलेला आरोपी सागर शर्मासंदर्भात अधिक माहिती गोळा करण्यासाठी दिल्लीहून सात जणांचे एक विशेष पथक रविवारी (17 डिसेंबर) सायंकाळी लखनौला पोहोचले. संसद भवनात प्रवेश करताना सागर शर्मानं घातलेले बूट आणि बँक खात्याशी संबंधित माहिती पथकानं गोळा केली. या प्रकरणी पथकाकडून फुटवेअर शोरूम मालकाची तीन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर सागर शर्माची आई, वडील आणि बहिणीचीही त्यांच्या घरी चौकशी करण्यात आली. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सागर शर्माचे त्याच्या कुटुंबीयांशी बोलणंही करुन देण्यात आलं. दरम्यान, पुरावे गोळा केल्यानंतर काही तासांनी हे पथक दिल्लीला परतले.
बंद खोलीत कुटुंबीयांची चौकशी :दिल्लीच्या विशेष पोलीस दलाच्या चार पोलिसांनी सागर शर्माच्या घरी पोहोचले. यावेळी विशेष पथकानं कुटुंबीयांना एका बंद खोलीत नेऊन त्यांची गुप्तपणे चौकशी केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर शर्माचे वडील रोशन लाल शर्मा यांनी चौकशीदरम्यान सांगितलं की, त्यांना याबाबत काहीही माहिती नव्हती. घरातील सदस्यांनाही याविषयी काहीच माहित नाही. सागर हा फक्त भगतसिंग यांचा अनुयायी आहे. कोणाच्या तरी प्रभावाखाली त्यानं असं कृत्य केलंय, असं ते म्हणाले. सुमारे अर्धा तास चाललेल्या या चौकशीत तपास पथकानं सर्वांचे जबाब नोंदवले. तसंच यावेळी सागरचे सामानही पोलिसांनी जप्त केले.
सदाना फुटवेअरच्या मालकाची चौकशी : सागर शर्मानं चपलामध्ये स्मोक बॉम्ब लपवून तो संसदेत नेला होता. चौकशीदरम्यान सागर शर्मानं हे शूज नाटखेडा रोडवर असलेल्या सदना फुटवेअरमधून खरेदी केल्याचं सांगितलं. या पार्श्वभूमीवर दिल्लीहून आलेल्या विशेष पथकानं सदाना फुटवेअरचे मालक दीपक सदाना यांची सखोल चौकशी केली. चौकशीत दीपकनं सांगितलं की, सागर शर्मानं लान्सर कंपनीच्या दोन जोड्यांचे शूज खरेदी केले होते. त्यांची किंमत 699 रुपये होती. मात्र, सागर शर्मा दुकानात कधी आला. शूज केव्हा विकत घेतले हे सांगता येणार नाही. कारण दुकानात खूप लोकांची ये-जा सुरू असते. त्यामुळं सर्वांची माहिती देणं कठीण आहे, असं ते म्हणाले. यावेळी दिल्लीच्या विशेष पथकानं दुकानात बसवलेले दोन डीव्हीआर ताब्यात घेतले.
काय घडलं : आरोपी सागर शर्मा आणि डी. मनोरंजन यांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात उडी मारली. 'कॅन'मधून पिवळा गॅस उडवत घोषणाबाजी केली. त्यानंतर खासदारांनी त्यांना पकडलं. त्याचवेळी, अमोल शिंदे आणि नीलम देवी या अन्य दोन आरोपींनी संसद भवनाबाहेर स्मोक बॉम्ब फोडून 'हुकूमशाही चालणार नाही' अशा घोषणा दिल्या. पाचवा आरोपी ललित झा यानं कथितपणे संसदेबाहेर झालेल्या निदर्शनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले. तर सहाव्या आरोपीचं नाव महेश कुमावत असून तोदेखील या संपूर्ण कटाचा एक भाग होता.
हेही वाचा -
- संसदेत घुसलेल्या तरुणांनी स्वतःला पेटवून देण्याची आखली होती योजना, चौकशीत धक्कादायक माहिती उघड
- संसद सुरक्षा भंग प्रकरण : मास्टरमाईंड ललित झाचं दिल्ली पोलिसांपुढं आत्मसमर्पण; सात दिवसांची पोलीस कोठडी
- संसदेची सुरक्षा भंग करणाऱ्या चार आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी