नवी दिल्ली Cricket World Cup 2023 :2023 च्या विश्वचषकापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसलाय. संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज शुभमन गिल याला डेंग्यूची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. यामुळं रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या भारतीय संघाच्या पहिल्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर साशंकता निर्माण झालीय. आज काही चाचण्यांनंतर संघ व्यवस्थापन स्टार फलंदाजाच्या उपलब्धतेबाबत निर्णय घेणार असल्याचं बोललं जातंय. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यापूर्वी तो आजारी पडला, त्यामुळं त्याची डेंग्यूची चाचणी करण्यात आली होती. आता या परिस्थितीत भारतीय संघासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का : या विश्वचषकात भारतीय संघ रविवारी चेन्नई इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीचा सामना खेळणार आहे. या सामन्याममध्ये टीम इंडिया स्टार सलामीवीर फलंदाज शुभमन गिलशिवाय मैदानात उतरू शकते. शुभमन गिल गुरुवारी चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या टीम इंडियाच्या नेट सेशनमध्येही सहभागी झाला नसल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलंय. त्याच्या डेंग्यूशी संबंधित चाचण्या करण्यात आल्या. त्यात त्याला डेंग्यूची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यावर त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यामुळं तो पहिला सामना खेळू शकेल की नाही? यावर शंका कायम आहे. पण बीसीसीआयचं वैद्यकीय पथक शुभमन गिलच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.