आग्रा : आग्रा किल्ल्याच्या दिवाण-ए-आममध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रोजेक्शन मॅपिंग आणि संगीतामुळे नुकसान झाले आहे. एएसआयने युनेस्कोने ठरवून दिलेल्या ध्वनी पातळीमध्ये कार्यक्रमासाठी परवानगी दिली होती. मात्र 40 डेसिबलपेक्षा जास्त आवाजामुळे दिवाण-ए-आमच्या भिंतीला आणि छताला तडे गेले आहेत.
सुरक्षेसाठी बॅरिकेडिंग : हे तडे दोन ते सहा मिमीचे आहेत. एवढेच नाही तर संगीतामुळे चुन्याचे प्लास्टरही घसरले आहे. सोमवारी हा प्रकार एएसआयच्या अधिकाऱ्यांना समजताच एएसआय आता प्रोजेक्शन मॅपिंग शो आणि सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे दिवान-ए-आममध्ये झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करत आहे. यासोबतच दिवाण-ए-आमच्या खराब झालेल्या भागात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.
कार्यक्रमात अनेक मंत्री उपस्थित : आग्रा येथे 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी G20 शिखर परिषदेत महिला सक्षमीकरणावर एक बैठक झाली. त्यात सहभागी होण्यासाठी जी-20 च्या 13 देशांचे 145 प्रतिनिधी आले होते. 11 फेब्रुवारीच्या संध्याकाळी, आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आम येथे महिला, बाल विकास आणि संस्कृती मंत्रालयाने परदेशी पाहुण्यांसाठी प्रोजेक्शन मॅपिंग आणि सांस्कृतिक सादरीकरणाचे आयोजन केले होते. दिवाण-ए-आममध्ये सुमारे ४५ मिनिटांचे सादरीकरण झाले. यावेळी तेथे पडदे टाकून लेझर लाईट लावण्यात आले होते. तसेच सादरीकरणात लाईट आणि साउंडचा वापर करण्यात आला हहोता. आवाजासाठी दिवाण-ए-आम आणि किल्ल्यामध्ये ठिकठिकाणी स्पीकर लावण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री आणि आग्र्याचे खासदार प्रा. एसपी सिंह बघेल, यूपी सरकारमधील कॅबिनेट मंत्री बेबी राणी मौर्या तसेच G20 देशांचे अतिथी उपस्थित होते.