मुंबई - भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय)चे नेते आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासह नुकतीच काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर कन्हैया कुमार हे काँग्रेसमध्ये जाणार या चर्चेला चांगलेच उधान आले आहे.
'राहुल गांधी यांची भेट घेतली'
माध्यमांत सुरू असलेल्या या प्रवेसाबाबतच्या बातम्यांचे बऱ्याचदा त्यांच्याकडून खंडन झाले. मात्र, कन्हैया यांच्या प्रवेशाची जवळपास सर्व तयारी झाली आहे. ते लवकरच काँग्रेसमध्ये दाखल होणार असून, येणाऱ्या वर्षातील विधानसभेच्या निवडणुकीत कन्हैया कुमार हे काँग्रेसला चांगला फायदा मिळून देतील अशी चर्चाही आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. निवडणुक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या उपस्थितीत कुमार यांनी गेल्या शुक्रवारी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे.
'कन्हैयामुळे पक्षाला बिहारमध्ये सावरण्याची संधी मिळेल'
या प्रवेशाबाबत अनेक काँग्रेस नेत्यांना विश्वास वाटतोय, की कन्हैयामुळे पक्षाला बिहारमध्ये सावरण्याची संधी मिळेल. बिहारमध्ये गेल्या तीन दशकांपासून काँग्रेस काही खास काम करु शकली नाही. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत, मित्रपक्ष आरजेडी आणि सीपीआय (एमएल)च्या तुलनेत काँग्रेसच्या जागा फारच कमी आल्या. काँग्रेसने लढवलेल्या ७० पैकी केवळ १९ जागा जिंकल्या. आरजेडीने १४४ जागांपैकी अर्ध्याहून अधिक जागा जिंकल्या, तर सीपीआय (एमएल)ने १९ पैकी १२ जागा जिंकल्या जिथे त्यांनी उमेदवार उभे केले होते.
'कन्हैया कुमार पक्षावर कमालीचे नाराज असल्याचे समोर आले'
काही दिवसांपुर्वी हैदराबाद येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत कन्हैया कुमार यांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षानेच (सीपीआय) निषेध केला होता. त्यानंतर कन्हैया कुमार पक्षावर कमालीचे नाराज असल्याचे समोर आले आहे. तसेच, आपल्याला पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमुळे जी पाहीजे ती जागा मिळत नाही. किंबहून आपली घुसमट होत आहे अशी भावना कन्हैया यांची असल्यामुळे ते पक्षातून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत होते.
'कन्हैया यांच्यामुळे ही जागा भरून निघेल'
आजच्या परिस्थितीत काँग्रेससाठी कन्हैया कुमार यांचा पक्षात प्रेवेश ही पक्षासाठी मोठी जमेची बाजू असल्याचे बोलले जात आहे. कारण गेल्या एक-दोन वर्षात ज्योतीरादीत्य सिंधीया, सुष्मीता देव, जितीन प्रसाद आणि प्रियंका चतुर्वेदी अशा आश्वासक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांची जागा कन्हैया यांच्यामुळे भरून निघेल असही बोलले जात आहे. दरम्यान, कन्हैया कुमार यांच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशाबाबत सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा यांना विचारले असता, ते म्हणाले “मी फक्त एवढेच सांगू शकतो की ते या महिन्याच्या सुरुवातीला आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित होते. तसेच, त्यांनी या बैठकीत भाषणही केले आहे.
'स्वबळावर निवडणुक लढवण्याशिवाय सध्यातरी पर्याय उरलेला नाही'
कन्हैया कुमार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला तर, त्यांच्या वक्तृत्व कौशल्याचा मोठा परिणाम होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी उत्तर प्रदेशातील विधानसभेसाठी त्यांचा वापर होऊ शकतो. उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपा (2022)मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याची इच्छा दाखवत नाहीत. त्यामुळे काँग्रेसला स्वबळावर निवडणुक लढवण्याशिवाय सध्यातरी पर्याय उरलेला नाही, अशी परिस्थिती आहे.