लखनऊ - कोरोना काळात अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. महामारीमुळे भीषण परिस्थिती उद्भवली आहे. उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांचे मृतदेह नदीत वाहतानाच्या घटना काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. आता आणखी एक मानवतेला लाजवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिमध्ये दोन युवक कोरोना रुग्णांच्या मृतदेहाला राप्ती नदीच्या पुलावरून फेकताना दिसत आहेत. ही घटना राप्ती नदीवर बनवण्यात आलेल्या सीसई घाटावरील असल्याची माहिती आहे.
पुलावरून नदीत फेकला कोरोना रुग्णाचा मृतदेह मृतदेह फेकणारे दोघेही जण पीपीई कीटमध्ये -
दोन व्यक्ती राप्ती नदीत मृतदेह फेकत असल्याचे दिसताच, तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून खळबळ उडाली आहे. मृतदेह फेकणारे दोन तरुण कोण आहेत, याची चौकशी केली जात आहेत. दोघानींही पीपीई किट घातल्याचे दिसून येत असल्याने ते आरोग्य विभागातील कर्मचारी असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
नदीत कोणाचा मृतदेह फेकला?
व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत सीएमओ डॉ. विजय बहादुर सिंह यांनी सांगितले, की राप्ती नदीत फेकण्यात आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून तो मृतदेह सिद्धार्थनगर जिल्ह्यातील शोहरतगड येथील रहिवासी प्रेम नाथ मिश्रा यांचा आहे. कोरोनामुळे त्यांचा 25 मे ला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना L-2 रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, 28 मे ला त्यांचा मृत्यू झाला. कोरोना नियमांप्रमाणे त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला होता. व्हायरल व्हिडिओत मृतदेह राप्ती नदीत फेकण्यात येत असल्याचे दिसत आहे. याबाबत कोतवाली नगरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
योगी सरकारची यंत्रणा -
कोरोनाच्या दुसर्या लाटेने भारतातील बरीच राज्ये हादरली आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. संक्रमित लोकांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्यांना नद्यांमध्ये टाकले जात आहेत. उत्तर प्रदेशात अशी प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. लोकांनी मृतदेह नदीत फेकू नये म्हणून मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी राज्य सरकारने 5000 रुपये देण्याची व्यवस्था केली आहे. असे असूनही, पुलावरून मृतदेह नदीत फेकल्याची ही घटना समोर आली आहे.