नवी दिल्ली - कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून भारतीयांची सुटका होण्याची शक्यता आहे. कारण, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी भारतामधील कोरोनाच्या स्थितीवरून दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. कोरोनाची स्थिती महामारीवरून (पॅन्डिमिक) एन्डिमिसिटी होत असल्याचा अंदाज डॉ. स्वामीनाथन यांनी व्यक्त केला आहे. एन्डिमिक अवस्थेत रोग असल्यास नागरिक या रोगासोबत जगण्याचे शिकतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांची मुलाखत एका ऑनलाईन माध्यमाने घेतली. मुलाखतीत बोलताना डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या, की भारताचा विशालता, लोकसंख्येची विविधता आणि देशाच्या विविध भागांमध्ये असलेली प्रतिकारक्षमता लक्षात घेता कोरोनाची स्थिती कमी-जास्त होऊ शकते. आपण संसर्गाचे कमी प्रमाण असलेल्या एन्डिमिसिटीच्या अवस्थेत पोहोचू शकतो. असे असले तरी येत्या काळात कोरोनाच्या संसर्गाचे अत्युच्च प्रमाण दिसणार नाही. मात्र, ज्या ठिकाणी लसीकरणाचा वेग कमी आहे, त्या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण येत्या काही महिन्यांत अत्युच्च असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-' गेल्या 70 वर्षात जे देशाने कमावलं, ते सर्व मोदी विकत आहेत'; राहुल गांधींची टीका
प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण खूप कमी-
2022 अखेरीस कोरोनाचे लसीकरण हे 70 टक्के होण्याच्या स्थितीत असणार आहे. त्यामुळे देशाची स्थिती सामान्यवत होऊ शकणार आहे. लहान मुलांमधील कोरोनाच्या संसर्गाबाबत विचारले असता पालकांनी काळजी करू नये, असे डॉ. स्वामीनाथन यांनी सांगितले. सुदैवाने लहान मुलांमध्ये खूप सौम्य आजार होत असल्याचे सिरो सर्व्हेक्षणामधून दिसून आले आहे. प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. मात्र, रुग्णालयातील बालरुग्णदक्षता विभागासह विविध आरोग्य यंत्रणेने चांगले तयार असणे आवश्यक आहे. हजारो लोक अतिदक्षता विभागात दाखल होतील, अशी आपण चिंता करू नये.