नवी दिल्ली :काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी गुजरातमध्ये कोरोना बळींच्या संख्येत घोळ होत असल्याचा आरोप केला आहे. काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालाचा दाखला देत ते म्हणाले, की कित्येक कोरोना बळींची नोंद राज्यात 'हृदयविकाराच्या धक्क्याने निधन' अशी होत आहे.
ते म्हणाले, की गुजरातमध्ये शुक्रवारी (१७ एप्रिल) अधिकृतरित्या ७८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र, माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील केवळ सात शहरांमधील स्मशानांमध्ये मिळून ६८९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या सर्व मृतदेहांना पीपीई किट घालून, कोरोना मृतदेहांप्रमाणे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. हेच कदाचित 'गुजरात मॉडेल' आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. कोरोनाशी लढण्याचे मुख्य माध्यम म्हणजे देशात लसीकरण वाढविणे आहे. लसींच्या संख्येवर नव्हे तर देशाच्या लोकसंख्येनुसार लसीकरणाच्या टक्केवारीवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मनमोहनसिंग यांनी पत्रात म्हटले आहे. सध्या भारताने देशातील काही लोकांनाच लस टोचवली आहे. योग्य योजनेमुळे आपण लसीकरण अधिक चांगले करू शकतो, अशी खात्री असल्याचे सिंग यांनी पत्रात म्हटलं आहे. तसेच 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांनाही लस टोचवण्यात यावी, असेही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
हेही वाचा :कोरोना मृतांच्या सरकारी आकडेवारीवर प्रश्नचिन्ह का? वाचा भयावह वास्तव...(भाग-2)