नवी दिल्ली - कोरोनाची संभाव्य तिसरी लाट जीडीपीवर विपरित परिणाम करू शकते. देशाचा जीडीपीचा विकास दर 7 टक्क्यापर्यंत खाली येऊ शकतो, असे नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकार संपूर्ण देशाला पुरेसा ठरेल इतकं लसींचं उत्पादन आणि पुरवठा करण्यास असमर्थ आहे, असेही त्यांनी म्हटलं. तसेच केंद्र सरकार राज्यांना लसीचा पुरवठा करताना भेदभाव करत असल्याचे त्यांनी म्हटलं. गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांना पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा होत आहे. तर बिगर भाजपा राज्यांना लसीचा पुरवठा केला जात नाही, असे ते म्हणाले. केंद्राने राज्यांमध्ये भेदभाव न करता लसीचा पुरवठा करावा, असे ते म्हणाले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अभिजीत बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली ग्लोबल अॅडवायजरी बोर्डाची नियुक्ती केली आहे. राज्याला करोनासंदर्भात सल्ला देण्यासाठी या समितीचं गठन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या समितीची स्थापना केली आहे. कोलकातामध्ये या समितीची बैठक पार पडली. यावेळी अभिजीत बॅनर्जी यांनी लस पुरवठा, देशाची लसीकरण मोहीम आणि केंद्र सरकारचं अपयश या मुद्द्यांवरून परखड भूमिका मांडली आहे.