महाराष्ट्र

maharashtra

'मतदान प्रक्रियेसारखी बूथवर मिळेल कोरोनाची लस'

By

Published : Jan 3, 2021, 10:11 AM IST

देशात कोरोनाचा प्रसार झाला असून त्याला आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण देशाचे लक्ष कोरोना व्हॅक्सीनकडे लागले आहे. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशामध्ये ड्राय रन सुरू करण्यात आले आहेत. लसीकरणाची प्रक्रिया मतदानासारखीच राबवली जाणार आहे.

Harsh Vardhan
हर्षवर्धन

नवी दिल्ली -केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या (सीडीएससीओ) विशेष समितीने भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सीन' आणि ऑक्सफर्ड-अ‌ॅस्ट्राझेनेकाच्या 'कोविशिल्ड' या लसींच्या आपात्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. त्यानुसार आता देशभरात कोरोना लसीचा ड्राय रन सुरू करण्यात आला आहे. कोरोना लसीकरणाची प्रक्रिया मतदान प्रक्रियेसारखीच असेल. देशभरात 125 जिल्ह्यांमधील 286 ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी 96 हजार लोकांना प्रशिक्षण दिले गेले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

निवडणूक मतदानासाठी ज्याप्रकारे बूथचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे कोरोना लसीकरणासाठी बूथ तयार केले गेले आहेत. डॉ. हर्षवर्धन यांनी शनिवारी दिल्लीतील ड्राय रन्स सुरू असलेल्या ठिकाणांना भेटी देऊन पाहणी केली. त्यांनी जीटीबी रुग्णालय आणि दर्यागंजमधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली.

कोरोनावरील तज्ज्ञ गटाची झाली बैठक -

भारतीय औषध महानियंत्रक कार्यालय (डीजीसीए) आणि केंद्र सरकारच्या कोरोनावरील तज्ज्ञ गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात सीरमच्या लसीला मान्यता देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आता भारतात लसीकरणाला सुरूवात होणार आहे. सीरम इन्सिट्यूट कंपनीने आधीच लसीचे सुमारे ५ कोटी डोस तयार करून ठेवले आहेत. याबाबत डीजीसीए आज (रविवार) पत्रकार परिषद घेणार आहे.

आरोग्य मंत्र्यांनी घेतला यू-टर्न

संपूर्ण देशात कोरोना लस मोफत मिळणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी केले होते. मात्र, त्यांनी लगेच युटर्न घेतला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फक्त प्राधान्य देण्यात आलेल्यांनाच लस मोफत मिळणार आहेत. पहिल्यांदा देशभरातील १ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस मोफत दिली जाणार आहे. त्यानंतर दोन कोटी आघाडीवर काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना लस मोफत दिली जाणार आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details