तिरुवनंतपुरम - देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. केरळ सरकारच्या मंत्रिमंडळाने बुधवारी कोविड रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी स्थानिक संस्था निवडणुकांमध्ये शेवटच्या एका तासात कोविड रुग्णांना मतदानाची संधी दिली जाईल, असा निर्णय केरळ सरकारने घेतला आहे.
राज्यातील विजयन सरकारने बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. केरळ पंचायत राज अधिनियम आणि केरळ नगरपालिका अधिनियमात बदल करण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. विजयन मंत्रिमंडळाने कोविड रुग्णांसाठी केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा शेवटचा एक तास देण्याचे ठरविले आहे. आतापर्यंत मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत निश्चित करण्यात आली आहे. यापैकी सायंकाळी 5 ते सायंकाळी 6 वाजेचा शेवटचा एक तास केवळ कोविड रुग्णांसाठी असणार आहे.
दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना मतदानाची संधी मिळणार नाही. क्वारंटाईन असलेल्या रुग्णांना मतदान करता येईल. कोविड रुग्णांना मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी, यासाठी केरळच्या मंत्रिमंडळाने आरोग्य विभागाला विशेष प्रोटोकॉल तयार करण्याचे आणि मतदान केंद्रांवर योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.