हैदराबाद -एसआरएम मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरने सोमवारी भारत बायोटेक द्वारा विकसित कोव्हॅक्सिन मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली. तिसऱ्या टप्प्यात ही लस सुमारे 1000-1500 स्वयंसेवकांना दिली जाईल, असे एसआरएम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
पहिल्या टप्प्यात 30 स्वयंसेवकांवर लसीची तपासणी करण्यात आली. तसेच दुसऱ्या टप्प्यात 150 हून अधिक जणांवर त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, कोरोनाची जरी लस येत असली तरी संसर्गापासून बचाव होईपर्यंत कुठलाही हलगर्जीपणा होऊ नये. कोरोना लसीसाठी देशाला जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
दिल्लीतील कोरोना परिस्थितीचा आढावा-
एलजी अनिल बैजल यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत कोविड -19 लसीकरणाच्या सज्जतेचा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य सचिव आरोग्य विभाग आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अतिरिक्त संचालक प्रकाश के. सिंह उपस्थित होते.
दरम्यान, राष्ट्रीय राजधानीत एका दिवसात 1,674 कोरोनाबाधीत आढळून आले. तसेच सोमवारी कोरोना पॉझिटीव्ह दर 3.15 टक्क्यांवर घसरला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा-
राज्यातील सरकारी शाळांमधील तब्बल 2800 अध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. आरटी-पीसीआर चाचणीत हे सर्व कोरोनाबाधीत असल्याचे समोर आले आहे. सर्वात जास्त कोरोना पॉझिटीव्ह शिक्षक चंद्रपुरात आढळले आहेत. 265 शिक्षक आणि 115 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.