नवी दिल्ली Covid 19 New Varient : राजधानी दिल्लीत कोरोना JN.1 च्या नवीन प्रकाराचं पहिला रुग्ण मिळाल्याचं समोर आलंय. तपासणीसाठी पाठवलेल्या तीन नमुन्यांपैकी एका रुग्णामध्ये JN.1 आणि इतर दोन नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आलाय. JN.1 हे ओमिक्रॉनचे उप-प्रकार आहे आणि हा एक सौम्य संसर्ग आहे. तो दक्षिण भारतात पसरत आहे. याला घाबरण्याची गरज नसल्याचं दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले.
दिल्लीत RTPCR चाचण्या सुरु : कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची ओळख पटवण्यासाठी दिल्लीत RTPCR चाचणी सुरु करण्यात आलीय. दिल्लीचे आरोग्यमंत्री भारद्वाज म्हणाले की, ''दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये दररोज 250 ते 400 आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. काल झालेल्या सर्व चाचण्यांपैकी कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या रुग्णालयात चार-पाच कोरोना रुग्ण दाखल आहेत. मात्र, आतापर्यंत एकाही रुग्णाचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याचं वृत्त नाही."
अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण : देशातील केरळ, महाराष्ट्र, कर्नाटकात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. या राज्यांमध्ये कोरोनाचा एक नवीन प्रकारही आढळून आलाय. त्यामुळं तिथं खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतील सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयं कोरोनाबाबत सतर्क आहेत. दिल्लीतील 100 हून अधिक खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी सरकारनं 6,157 खाटा राखीव ठेवल्या आहेत.