नवी दिल्ली : कोरोनामुळे अनेक नागरिकांना विविध प्रकारच्या आजारांनी ग्रासले आहे. त्यातील अनेक नागरिक अद्यापही कोरोनामुळे झालेल्या गुंतागुंतीच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे कोरोनाचे परिणाम अद्यापही नागरिकांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम करत आहेत. त्यातच आता SARS-CoV-2 विषाणूची लागण झालेल्या नागरिकांच्या जीनोम संरचनेत बदल जाणवू शकत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या नागरिकांच्या रोग प्रतिकारशक्तीवर गंभीर परिणाम होत असल्याचेही या संशोधनात स्पष्ट झाले आहे. आपल्या पेशींमधील अनुवांशिक पदार्थ क्रोमॅटिन नावाच्या संरचनेत साठवले जातात. त्यामुळे काही विषाणूंनी क्रोमॅटिनच्या संरचनेत बदल केल्याची नोंद करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा आपल्या क्रोमॅटिनवर होऊ शकतो परिणाम :कोरोनाच्या SARS-CoV-2 या विषाणूंचा आपल्या क्रोमॅटिनवर परिणाम होऊ शकतो की नाही हे संशोधकांना माहीत नव्हते. कोविड-19 संसर्गानंतर मानवी पेशींमधील क्रोमॅटिन आर्किटेक्चरचे सर्वसमावेशक वर्णन नेचर मायक्रोबायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात करण्यात आले आहे. सामान्य पेशीच्या अनेक सुसज्ज क्रोमॅटिन आर्किटेक्चर्स संसर्गानंतर अव्यवस्थित होत असल्याचे या संशोधनात आम्हाला आढळल्याची माहिती टेक्सास विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विभागाचे प्राध्यापक वेन्बो ली यांनी दिली. कोरोनाच्या या विषाणूचे सामान्य आकार एकत्र मिसळून त्याचे यीन आणि यांग हे भाग गमावत असल्याचेही ली यांनी यावेळी नमूद केले आहे.