चेन्नई : कोरोना लाटेच्या दुसऱ्या तडाख्यात भारतातील वैद्यकीय सेवा पुरती विस्कळीत झाली आहे. देशभरात रेमडेसिवीर, कोरोना लस आणि ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. यातच दिलासादायक बाब म्हणजे जगभरातून भारतासाठी मदत पाठवली जात आहे. आज (शुक्रवार) सकाळी भारतीय वायुदलाच्या एका विमानाने ब्रिटनहून ४५० ऑक्सिजन सिलिंडर आणले आहेत.
कस्टम क्लिअरन्स केवळ १५ मिनिटात..
विशेष म्हणजे, ऑक्सिजन सिलिंडर आणल्यानंतर त्यांच्या कस्टम क्लिअरन्सची प्रक्रिया केवळ १५ मिनिटांमध्ये पार पाडण्यात आली. या सिलिंडरमध्ये प्रत्येकी ४६.६ लिटर मेडिकल ऑक्सिजन आहे. कस्टम विभागाने ट्विट करत याबाबत माहिती दिली.
परराष्ट्र मंत्रालयाने मानले आभार..
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या मदतीसाठी ब्रिटनचे आभार मानले आहेत. ब्रिटनने रविवारी भारताला १ हजार व्हेंटिलेटर्स पाठवण्याचीही घोषणा केली होती. तसेच, ब्रिटनमधील एका कंपनीने भारताला पाच हजार ऑक्सिजन सिलिंडर मदत म्हणून देण्याची तयारी दर्शवली आहे. यापूर्वी सोमवारी या कंपनीकडून ९०० ऑक्सिजन सिलिंडरची खेप भारतात दाखल झाली होती.