मुंबई -गीतकार जावेद अख्तर यांच्या मानहानी प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौतला न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. मानहानीचा खटला दुसऱ्या न्यायालयात चालविण्याची तिची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रनौतच्या विरोधात अंधेरी येथील न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कंगनाने आपल्याला या न्यायालयात न्याय मिळेल यावर विश्वास नसल्याने खटला इतर न्यायालयात चालवावा अशी मागणी केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
हेही वाचा-अडेलतट्टूपणे वागल्या तर विमा कंपन्यांवर गुन्हेच दाखल करणार - अजित पवार
वॉरंट काढण्याचा अंधेरी न्यायालयाने दिला होता इशारा-
गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रणौत विरोधात मानहाणीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी कंगनाला वेळोवेळी नोटीस बजावली होती. त्यानंतरही ती कोर्टात हजर झाली नसल्याने तिला २० सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच यावेळी न्यायालयात हजर न राहल्यास अटक वॉरंट काढू, असा सूचक इशारा तिला अंधेरी कोर्टाकडून देण्यात आला होता. त्यामुळे कंगना 20 ऑक्टोबरला न्यायालयात हजर झाली होती.
हेही वाचा-'मन्नत'वर छापा नाही, कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आलो असल्याचे NCB अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
कंगनाची याचिका रद्द करण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली होती
जावेद अख्तर यांनी कंगना रणौतच्या विरोधात मानहानीचा खटला उच्च न्यायालयात दाखल केला होता. हा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका कंगनाने न्यायालयात दाखल केली होती. यावर 1 सप्टेंबरला सुनावणी झाली होती. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आपला आदेश राखीव ठेवला होता. 9 सप्टेंबर रोजी न्यायालयाने कंगनाची ही याचिका फेटाळली होती.
हेही वाचा-Aryan Khan Drug Case : आर्यनच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; ३० ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच मुक्काम
काय आहे नेमके प्रकरण?
'अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिपब्लिक टीव्हीवर मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांनी घेतलेल्या मुलाखतीत कंगनाने आपल्याविरोधात बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी केली', अशी तक्रार गीतकार जावेद अख्तर यांनी वकिल जय भारद्वाज यांच्यामार्फत केली. याविषयी पोलिसांच्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, वारंवार नोटीस देऊनही कंगना न्यायालयात हजर राहिली नाही. त्यामुळे महानगर न्यायदंडाधिकारी आर. आर. खान यांनी कंगनाला अखेरची संधी देत पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश मागील सुनावणीत दिले होते. शिवाय कंगना पुन्हा गैरहजर राहिल्यास तिच्याविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा अख्तर यांना दिली होती.