धमतरी (छत्तीसगढ) Court of Bhangarao Mai : एखाद्यानं चूक केली तर त्याला कोर्टात शिक्षा होते, पण छत्तीसगडमध्ये एक असं कोर्ट आहे ज्यात चक्क देवी-देवतांनाही शिक्षा होते! हे विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. ही शिक्षा देवी-देवतांचे न्यायाधीश देतात, ज्यांना 'भंगाराव माई' म्हटलं जातं. भंगाराव माईंच्या दरबारात देवी-देवतांना त्यांच्या चुकांची शिक्षा मिळते.
शेकडो वर्षांपासून परंपरा सुरू आहे : छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यातील आदिवासी समाजात ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. भंगाराव देवीला मानणारे लोकं सांगतात की, आदिवासी समाजाच्या पारंपारिक परंपरेनुसार गावातील देवतांनाही स्वतःला निर्दोष सिद्ध करावं लागतं. त्यासाठी 'भंगाराव माईं'चं न्यायालय भरतं. सुनावणीनंतर इथे गुन्हेगाराला शिक्षाही होते. दरवर्षी भाद्रपद महिन्यात धमतरी जिल्ह्यातील कुर्सीघाट बोराई येथे आदिवासी देवतांच्या न्यायमूर्ती भंगाराव माईची जत्रा भरते. ज्यामध्ये परिसरातील देवी-देवता एकत्र येतात.
महिलांना जाण्यास मनाई आहे : या अनोख्या परंपरेचे साक्षीदार होण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी हजारो लोक कुर्सीघाटावर पोहोचले. येथे ही जत्रा कुंवरपत आणि डाकदार यांच्या नेतृत्वाखाली विधीपूर्वक संपन्न झाली. कुर्सीघाटात भंगाराव माईंचा शतकानुशतके जुना दरबार आहे. हे देवी-देवतांचं न्यायालय म्हणून ओळखलं जातं. भंगाराव माईंच्या मान्यतेशिवाय या परिसरात कोणताही देव किंवा देवता कार्य करत नाही, अशी मान्यता आहे. विशेष म्हणजे, महिलांना या विशिष्ट न्यायालयाच्या ठिकाणी जाण्यास मनाई आहे.
देवी-देवतांना शिक्षा का :श्रद्धेपाई लोक देवी-देवतांची पूजा करतात, असं मानलं जातं. मात्र देवांनी आपलं कर्तव्य पार पाडलं नाही तर भंगाराव माईंच्या दरबारात त्यांना शिक्षा होते. सुनावणी दरम्यान, देवी-देवता कोर्टरूममध्ये उभे असतात. इथे भंगाराव माई न्यायाधीश म्हणून बसतात. गावातील कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा समस्या दूर करणे शक्य नसल्यास, गावातील स्थापित देवी-देवतांना जबाबदार मानलं जातं. सुनावणीनंतर येथे गुन्हेगाराला शिक्षा होते.
भंगाराव माईची कहाणी खूप आश्चर्यकारक आहे. ही माई बंग देशातून आली होती. त्यामुळे तिचं नाव 'भंगाराव' पडलं. या परिसरात देवी-देवतांशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या आहेत. त्यामुळे या न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. - रामप्रसाद मरकाम, ग्रामीण