नवी दिल्ली चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत कंपन्यांच्या उत्पन्नावर आकारण्यात येणारा कॉर्पोरेट टॅक्स Corporate Tax Collection 34 टक्क्यांनी वाढल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे. आयकर विभागाने एप्रिल-जुलै दरम्यान कॉर्पोरेट कर संकलनात वाढ झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली. कर संकलनाची नेमकी रक्कम उघड न करता विभागाने म्हटले आहे की, "2022-23 या आर्थिक वर्षात 31 जुलै 2022 पर्यंत कॉर्पोरेट कर संकलन मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 34 टक्क्यांनी Corporate Tax Collection 34 percent Increase जास्त आहे."
आयकर विभागाने म्हटले आहे की, 2021-22 या आर्थिक वर्षात कॉर्पोरेट कराचे एकूण संकलन 7.23 लाख कोटी रुपये होते, जे 2020-21 च्या कर संकलनापेक्षा 58 टक्के अधिक आहे. "चालू आर्थिक वर्षातही कर संकलनातील वाढीचा सकारात्मक कल कायम आहे. यावरून असे दिसून येते की कर प्रणालीचे सुलभीकरण आणि कोणत्याही सवलतीशिवाय कर दर कमी करण्यासाठी उचललेली पावले प्रभावी ठरली आहेत," असे विभागाने म्हटले आहे.