न्यूयॉर्क : कोरोनामुळे जगभारातील अनेक नागरिकांचा बळी गेल्याने कोरोनाची नागरिकांमध्ये चांगलीच दहशत आहे. मात्र आता कोरोनाच्या नवीन चाचणीमुळे कोरोना रुग्णांना व्हेंटीलेटरवर ठेवण्याची आवश्यकता आहे की नाही, याबाबतची माहिती मिळणार आहे. कोणात्या रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो, याचीही अद्ययावत माहिती मिळणार आहे. सेंट लुईसमधील वाशिंग्टन यूनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात याबाबतचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर जलद उपचार करुन विषाणूमुळे होणारा मृत्यू टाळता येऊ शकतो.
कोरोना रुग्णांना असलेला धोका ओळखता येणार :कोरोनाच्या नवीन तपासणीतून आता कोरोना रुग्णांच्या जीवाला असलेला धोका ओळखता येणार असल्याचा दावा या संशोधनातून करण्यात आला आहे. रुग्णाला हानीकारक प्रथिने ओळखणे उपयुक्त ठरू शकते. आपल्याला केवळ कोविड-१९ कारणीभूत असलेल्या विषाणूचाच नाही तर भविष्यात नवीन विषाणूंचाही सामना करावा लागू शकतो, असे स्कूल ऑफ न्यूरोजेनोमिक्स अँड इन्फॉर्मेटिक्स सेंटरचे संचालक तथा या संशोधनाचे संशोधक कार्लोस क्रुचागा यांनी स्पष्ट केले. आम्ही कोविड रुग्णांच्या रक्तातून प्रथिनांची पातळी तपासू शकतो. त्यातून गंभीर परिणामांचा धोका पटकन निर्धारित करू शकत असल्याचेही क्रुचगा यांनी यावेळी स्पष्ट केले.
उच्च थ्रूपुट प्रोटिओमिक्स तंत्रांचा वापर :या संशोधकांनी सेंट लुईसमधील बार्न्स ज्यू हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या ३३२ कोविड-१९ रुग्णांच्या प्लाझ्मा नमुन्यांचा अभ्यास केला. त्यांची तुलना SARS CoV २ या विषाणूची लागण न झालेल्या १५० रुग्णांच्या प्लाझ्मा नमुन्यांशी केली. रक्तातील प्लाझ्मामधील प्रथिनांचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी उच्च थ्रूपुट प्रोटीओमिक्स नावाच्या तंत्राचा वापर केला. त्यामुळे प्रथिनांचे ओव्हरएक्सप्रेस आणि कमी एक्सप्रेशन ओळखले जाते. त्याला डिसरेग्युलेशन देखील म्हणत असल्याचे या संशोधकांनी स्पष्ट केले. हे संशोधन 'जर्नल आयसायन्स'मध्ये प्रकाशित झाले आहे.
कोरोना रुग्णांच्या अडचणींचा अंदाज :या संशोधकांनी आणखी पाच प्रथिने ओळखली आहेत. ही प्रथिने कोरोना रुग्णांच्या प्लाझ्मामध्ये बदललेली आढळल्यास रुग्णाच्या मृत्यूचा धोका दिसून येतो. अनेक प्रथिने शरीराच्या रोगप्रतिकारक प्रतिसादाशी संबंधित होती असेही क्रचगा यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र या प्रथिनांच्या उपसंचामुळे रुग्णांना वेंटिलेशनची आवश्यकता असण्याची शक्यता वाढली आहे. या प्रोटिओमिक्स पद्धतींचा वापर करून कोरोना रुग्णांच्या अडचणींचा अंदाज आपण लावू शकतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या निष्कर्षांची चाचणी करण्यासाठी संशोधकांनी बोस्टनमधील मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील २९७ कोविड-१९ रूग्ण आणि ७६ नियंत्रणांमधील समान प्रोटीओमिक्स डेटाचा अभ्यास केला. या वेळी समान प्रथिने रुग्णांच्या दोन्ही गटांमध्ये व्हेंटिलेटरची गरज आणि मृत्यूचा अंदाज लावत असल्याचे स्पष्ट झाल्याची माहितीही या संशोधकांनी दिली आहे.
हेही वाचा - Omicron Sub Variants : ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीतून कसा पडतो बाहेर, जाणून घ्या सविस्तर माहिती