चंदीगड :कोरोनापासून बचाव म्हणून सध्या जगभरात सगळीकडे लसीकरण प्रक्रिया सुरू आहे. विविध कंपन्यांच्या लसींचा वापर करुन लोकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न सर्व सरकार करत आहेत. विषाणूची दुसरी लाट ही पहिल्या लाटेहून अधिक धोकादायक असल्यामुळे लसीकरणाचे महत्त्व आणखी वाढले आहे. मात्र, यासोबतच लोकांच्या मनामध्ये लसींबाबत कित्येक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. यापैकीच एक प्रश्न म्हणजे लसींचे दोन डोस एकाच वेळी घेतले, तर काय होईल?
काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये असा प्रकार समोर आला. राज्याच्या दौसा गावातील एका महिलेला दहा मिनिटांच्या अंतराने कोरोना लसीचे दोन डोस देण्यात आले. यानंतर ही महिला घाबरली. आपल्याला काही दुष्परिणाम तर नाहीत ना होणार अशी भीती तिला वाटू लागली. याबाबतच ईटीव्ही भारत हरियाणाच्या प्रतिनिधींनी चंदीगढ पीजीआयचे वरिष्ठ डॉक्टर सोनू गोयल यांच्यासोबत बातचीत केली आहे. डॉ. सोनू हे पीजीआय मधील स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ विभागात प्राध्यापक आहेत.
एका वेळी दोन डोस घेतल्याने धोका निर्माण होतो का?
डॉ. सोनू यांनी सांगितले, की कोरोना लसीचे दोन डोस एकाच वेळी घेतल्यामुळे काय दुष्परिणाम होतात, याबाबत अद्याप जास्त संशोधन झाले नाही. कारण असे प्रकार अगदीच कमी प्रमाणात समोर आले आहेत. मात्र त्याचबरोबर, एकाच वेळी दोन डोस घेतल्यामुळे आतापर्यंत कोणाला दुष्परिणाम जाणवल्याचेही प्रकरण अद्याप समोर आले नाही.