आग्रा (उत्तरप्रदेश): महाशिवरात्रीपूर्वी आग्रा येथील ताजमहालमध्ये पूजा-विधी करू देण्याची मागणी जोर धरू लागली. यासोबतच सम्राट शाहजहानचा ३६८ वा उर्स ताजमहालमध्ये साजरा करण्यास हिंदू महासभेने विरोध केला आहे. गुरुवारी, शिव-पार्वतीच्या गेटअपमधील लोक, हिंदू महासभेचे सदस्य, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) समोर निषेध नोंदवण्यासाठी धरणे धरत बसले आहेत. त्यामुळे आता यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
परवानगी नसताना साजरा होतो उर्स:सम्राट शाहजहानच्या 368 व्या उर्सला विरोध करण्यासाठी पार्वतीच्या रूपातील आंदोलक गुरुवारी सकाळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाबाहेर उपोषणाला बसले. शहाजहानचा उर्स ताजमहालमध्ये परवानगीशिवाय साजरा केला जात असल्याचा आरोप उपोषणाला बसलेल्या हिंदू महासभेच्या लोकांनी केला आहे. त्यामुळे आता पुरातत्त्व विभाग यावर काय निर्णय घेतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.
शिवरात्रीला पूजेची परवानगी देण्याची मागणी:हिंदू महासभेचे सदस्य गुरुवारी उपोषणाला बसल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांची समजूत घालून त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला, पण शिव- पार्वतीच्या रूपातील आंदोलक धरणे आंदोलनातून हटले नाहीत. शाहजहानच्या उर्सला उत्सवाला कुठलीही परवानगी नसल्याचा दावा हिंदू महासभेने केला आहे. आग्र्यातील ताजमहाल हा प्रत्यक्षात तेजोमहालय असल्याने त्याला येत्या महाशिवरात्रीला याठिकाणी पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.