नवी दिल्ली- कोरोनाची दुसरी लाट असताना जमावाची होणारी गर्दी किंवा सुपर स्प्रेडर कार्यक्रमांवर बंदी लावण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य व केंद्र सरकारला दिले आहेत. लॉकडाऊन लावण्याचा विचार करण्याची सूचनाही सर्वोच्च न्यायालयाने सू मोटोवरील आजच्या सुनावणीत केली आहे.
जमावाची मोठी गर्दी आणि सुपर स्प्रेडर कार्यक्रमावर बंदी लागू करण्याची आम्ही गांभीर्याने केंद्र सरकार व राज्य सरकारांना विनंती करत आहोत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने लॉकडाऊन लावण्यावरही ते विचार करू शकतात. लॉकडाऊनचा सामाजिक-आर्थिक तसे दुर्बल घटकांवर होणाऱ्या परिणामांची आम्हाला माहिती आहे. त्यामुळे जर लॉकडाऊनसारख्या उपाययोजना केल्या तर त्यांच्या गरजेसाठी व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे.
हेही वाचा-कर्नाटकात एकाच हॉस्पिटलमध्ये २४ कोरोना रुग्णांचा मृत्यू, ऑक्सिजन न मिळाल्याने १२ मृत्युमुखी
कोरोनाला अटकाव करण्यासाठी काय नियोजन केले?
कोरोनाचा आजवर 1,99,25,604 लोकांना संसर्ग, 34,13,642 सक्रिय रुग्ण आणि 2,18,959 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी काय प्रयत्न केले आहेत, याची लेखी माहिती सादर करण्याचे सर्वोच्च न्यायलयाने आदेश दिले आहेत. रोगाला अटकाव करण्यासाठी भविष्यातील नियोजन काय केले आहे, याची माहिती देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य व केंद्र सरकारला दिले आहेत.