नवी दिल्ली: काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) (Congress Executive) बैठक रविवारी संपली, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे ( All India Congress Committee) सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले, "सीडब्ल्यूसीने एकमताने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे " त्यांनी असेही सांगितले की अध्यक्ष लवकरच पक्षाला पुन्हा बळकट करण्यासाठी उपाययोजना सादर करण्याच्या प्रक्रियेत आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर एक रणनीती तयार करण्याचा कार्यक्रम आखला जाईल तत्पुर्वी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचा गट पुन्हा एकत्र येऊन चर्चा करेल.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रणनीतीचा कार्यक्रम राजस्थानात आयोजित करण्याची सूचना केली आहे. "काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आमचे नेतृत्व करतील आणि भविष्यातील पावले उचलतील. आम्हा सर्वांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे," असे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. गोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकांचे निकाल आणि भविष्यातीव वाटचाल हाच बैठकीचा मुख्य विषय होता. सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्ष आहेत. 5 राज्यांच्या निवडणुकां आणि आगामी निवडणुकांची तयारी यावर आम्ही चर्चा केली.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पक्षप्रमुख राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा, केसी वेणुगोपाल, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि पी चिदंबरम आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. बैठकीपूर्वी असंतुष्ट नेत्यांच्या प्रतिनिधींनी, पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले तसेच संघटनेच्या फेरबदलासाठी दबाव आणला, त्यांनी सूचित केले की अंतर्गत निवडणुकांचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला जाऊ शकतो. या बैठकीत गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा हे असंतुष्ठ नेतेही सहभागी झाले होते.
काँग्रेसने 'आप' कडून पंजाब गमावले, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर हे भाजपकडून हिसकावून घेऊ शकले नाही आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये पक्षाची संख्या सर्वात खालच्या पातळीवर गेली. सोनिया गांधी सक्रियपणे प्रचार करत नव्हत्या राहुल गांधी, प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह, निवडणुकीत काँग्रेसचे स्टार प्रचारक सक्रीय होते. राहुल आणि प्रियंका यांनी पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये प्रमुख भूमिका बजावली होती.