शिवसागर (आसाम) - आसाममध्ये यंदा विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसकडून प्रचार सभा आयोजीत करण्यात आला होती. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल यांनी प्रचार सभेत भाजपावर जोरदार टीका केली. भाजपा आणि आरएसएस आसामचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, राज्यात सत्तेत आल्यास काँग्रेस कधीच नागरिकत्व (सुधारणा) कायदा लागू करणार नाही, असे ते म्हणाले.
मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी आसाममधील आपल्या पहिल्या जाहीर सभेत भाषण करताना राहुल गांधींनी भाजपावर जोरदार टीका केली. राज्याला स्वतःचा मुख्यमंत्री हवा आहे. जो लोकांचा आवाज ऐकल. केवळ नागपूर आणि दिल्लीचा नाही, अशी टीका राहुल यांनी केली. आसाममधील बेकायदेशीर वास्तव्याचा प्रश्न चर्चेतून सोडवण्यात येईल, असे ते म्हणाले.
भाजपाकडून आसामचे विभाजन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जर आसामचे विभाजन झाले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांना काही त्रास सहन करावा लागणार नाही. मात्र, आसाम आणि उर्वरित भारतातील लोकांवर त्याचा परिणाम होईल. काँग्रेस आसाममध्ये कोणत्याही परिस्थितीत सीएए कायद्याची अंमलबजावणी करणार नाही, असेही ते म्हणाले.