नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील काही वर्तमानपत्रातील योगी सरकारच्या जाहिरातीमध्ये थेट पश्चिम बंगालचे उड्डाणपूल छापले. त्यावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेता अभिषेक मनु सिंघवी यांनी योगी सरकारची खिल्ली उडविली आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की उत्तर प्रदेशमधील विकास दाखविण्यासाठी बिश्त सरकारने (योगी सरकार) कोलकात्यामधील उड्डाणपूल दाखविले. जर विकास दाखवायचा होता, तर मायावती यांनी तयार केलेले एफ 1 ट्रॅक दाखवायचा होता. अन्यथा अखिलेश यांनी तयार केलेला आग्रा महामार्ग दाखवायचा होता. त्यामध्ये किमान उत्तर प्रदेशचे फोटो तरी आले असते.
हेही वाचा-Ganeshotsav 2021: अशी आहे सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाची आख्यायिका, वाचा....
वर्तमानपत्राने मागितली माफी-
रविवारी काही वर्तमानपत्रांमध्ये मुख्य पानावर योगी आदित्यनाथ यांच्या कामगिरीचे फोटो म्हणून विकासाचे फोटो दाखविले होते. त्यामधील एक फोटो कोलकातामधील उड्डाणपुलाचा होता. तर दुसरा फोटो हा एचएसई व्हिजन या कंपनीचा होता. योगी सरकारच्या विकासाचा दावा केलेले दोन्ही फोटो उत्तर प्रदेशचे नव्हते. या जाहिरातीवरून वाद झाल्यानंतर वर्तमानपत्राने माफी मागत मार्केटिंग विभागाच्या चुकीने फोटो छापल्याचे स्पष्टीकरण दिले.