नवी दिल्ली:प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कर्नाटकातील बांदीपूर आणि मुतुमाला व्याघ्र प्रकल्पांना भेट दिली. बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात पंतप्रधान सफारीचा आनंद घेत असल्याचे चित्र समोर आले आहे. आता काँग्रेसने पंतप्रधानांच्या या जंगल सफारीच्या दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
वास्तव मात्र अगदी उलट:बांदीपूरमध्ये 50 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या टायगर प्रकल्पाचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान घेत असल्याची टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली. जयराम रमेश यांनी ट्विट केले की, 'आज पंतप्रधान बांदीपूरमध्ये ५० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रोजेक्ट टायगरचे संपूर्ण श्रेय घेतील. पर्यावरण, जंगल, वन्यजीव आणि वनक्षेत्रात राहणारे आदिवासी यांच्या रक्षणासाठी केलेले सर्व कायदे उद्ध्वस्त होत असताना ते खूप तमाशा करतील. असे केल्याने ते (पंतप्रधान मोदी) कदाचित ठळक बातम्या मिळवतील पण वास्तव याच्या अगदी उलट आहे.
काँग्रेसने सुरु केलाय प्रकल्प: कर्नाटक काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काँग्रेसनेही पंतप्रधान मोदींवर ट्विटद्वारे हल्लाबोल केला. इंदिरा गांधींचा शावकासोबतचा फोटो शेअर करत ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'बांदीपूर व्याघ्र संवर्धन प्रकल्प, जिथे तुम्ही आज सफारीचा आनंद घेत आहात, तो 1973 मध्ये काँग्रेस सरकारने लागू केला होता. त्यामुळे आज वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याशिवाय काँग्रेसने मजेशीरपणे लिहिले की, त्यांची पीएम मोदींना खास विनंती आहे की बांदीपूर अदानींना विकू नये.
बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाबद्दल जाणून घ्या: जर तुम्ही अधिकृत आकडेवारी पाहिली तर 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू झाला तेव्हा वाघांची संख्या 12 होती. परिस्थिती अशी होती की मोठ्या प्रमाणात अवैध शिकार आणि संरक्षणाअभावी वाघ नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचले होते. वाघांची संख्या नष्ट होण्याच्या चिंतेमुळे 19 फेब्रुवारी 1941 रोजी स्थापन करण्यात आलेल्या पूर्वीच्या वेणुगोपाल वन्यजीव उद्यानातील बहुतांश वनक्षेत्राचा समावेश करून बांदीपूर राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1985 मध्ये या क्षेत्राचा विस्तार 874 चौरस किलोमीटर करण्यात आला, त्यासोबतच त्याचे नाव बांदीपूर राष्ट्रीय उद्यान ठेवण्यात आले.
हेही वाचा: पंतप्रधान मोदींनी हत्तींना भरवला ऊस