हैद्राबाद : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार राजकीय हल्ला चढवला होता. अगदी काँग्रेसलाही शहरी नक्षलवाद्यांची टोळी म्हटलं जायचं असं ते म्हणाले होते. त्यांवर काँग्रेसनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राजकीय हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी हे मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केलाय. त्यांचाच पक्ष चार वेळा सत्तेत असलेल्या मध्य प्रदेशसारख्या राज्यातही विरोधकांवर हल्ला करत आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेस पक्षाचा इतक्या वेळा उल्लेख केला, जणू ते काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत, असा टोमणा पवन खेरा यांनी लगावला.
सरकारचं काम 'शून्य' :पत्रकार परिषदेला बोलताना पवन खेरा म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी मध्य प्रदेशातील 51 मिनिटांच्या भाषणात 44 वेळा काँग्रेसचा उल्लेख केला. ज्या राज्यात 18 वर्षे भाजपची सत्ता आहे, तिथे तुम्ही 44 वेळा काँग्रेसचं नाव घेत आहात. यावरून मध्य प्रदेशातील सरकारचं काम 'शून्य' असून केवळ खोटी भाषणं केली जात असल्याचं दिसून येतं. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, 2018 मध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन होऊन केवळ 15 महिने टिकलं. या काळात 6 लाख तरुणांना युवा स्वाभिमान योजनेचा लाभ देण्यात आला. 20 लाख शेतकऱ्यांना सरकारनं मदत केली. पुरस्कार देऊनही राजस्थानमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या गेहलोत सरकारवर पंतप्रधानांनी टीका केली.
काँग्रेस सरकारवर टीका : पंतप्रधानांनी राजस्थानमधील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली. महामारीच्या काळात प्रभावी प्रशासनासाठी त्यांनी राज्याला कसं बक्षीस दिलं, हे ते विसरले असावेत. सत्तेत असताना गेहलोत यांनी 2 हजार 500 महाविद्यालयं उघडली होती. विकास केला, स्वास्थ आणलं, चिरंजीवी योजना, 25 लाखांचा विमा मिळाला. एकेकाळी 9.2% असलेली वित्तीय तूट आता 3% इतकी कमी झाली आहे. तरीही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप कसा?" असा सवाल त्यांनी केलाय.
महिला आरक्षणाला आणखी 10 वर्षे लागतील :महिला आरक्षण विधेयकाला कायदा बनवण्यावरून काँग्रेसनं भाजपलाही धारेवर धरलं. पवन खेरा म्हणाले, "भाजपा काँग्रेसवर महिला आरक्षणविरोधी असल्याचा आरोप करतो, तर 1989 मध्ये आम्ही (काँग्रेस) लोकसभेत विधेयक मंजूर करून राज्यसभेत आणलं. तेव्हा सातपैकी चार जणांनी विधेयकाला विरोध केला होता. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, राम जेठमलानी, जसवंत सिंग हे भाजपाचेच होते. महिला विधेयकाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले, त्यांना 9 वर्षांची सत्ता, विधेयक मंजूर करायला विरोधकांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. ज्याची अंमलबजावणी होण्यासाठी आणखी 10 वर्षे लागतील.