नवी दिल्ली Congress Foundation Day : काँग्रेसनं २८ डिसेंबर रोजी पक्षाचा स्थापना दिवस नागपुरात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आरएसएसचं मुख्यालय नागपुरात आहे. त्यामुळे याद्वारे पक्षाला आरएसएस आणि भाजपाला संदेश द्यायचा असल्याचं बोललं जातंय.
काँग्रेस शक्तीप्रदर्शन करणार : पक्ष त्यादिवशी नागपुरात मोठा मेळावा आयोजित करेल. या मेळाव्याला सोनिया गांधीही संबोधित करतील, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. या रॅलीला सोनिया गांधी यांच्या व्यतिरिक्त राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा देखील संबोधित करणार आहेत. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेही या रॅलीत सहभागी होतील. येथे पक्ष आपली पूर्ण ताकद दाखवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
नागपुरची निवड का : राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितलं की, यंदा काँग्रेसचा स्थापना दिवस आम्ही उत्साहात साजरा करू. "मुंबईत १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. पक्ष याठिकाणी मोठा मेळावा आयोजित करणार आहे. यासाठी मुंबई हा पर्याय असला तरी यावेळी आम्ही नागपूरची निवड केली. याचं कारण कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांची तशी इच्छा आहे. नागपुरात मेळावा आयोजित केल्यास त्यांच्यासाठी भौगोलिकदृष्ट्या जवळचे ठरेल", असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
'इंडिया' आघाडीच्या नेत्यांना बोलावलं जाईल का : या मेळाव्याद्वारे काँग्रेसला पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकायचं आहे. त्यापूर्वी १९ डिसेंबरला 'इंडिया' आघाडीची बैठकही होईल. या मेळाव्याला पक्ष कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार असल्यानं याला राजकीय महत्त्व असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. यामुळे आम्हाला निवडणुकीत लाभ मिळेल. संघाचं मुख्यालय नागपुरात आहे. मात्र त्यांचा शहरावर कोणताही प्रभाव नाही. येथून ते देशभरात त्यांची संस्था चालवतात, असं त्यांनी नमूद केलं. काँग्रेस स्थापना दिनी 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनाही निमंत्रित केले जाणार का, यावर चव्हाण म्हणाले की, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र हा पक्षाचा कार्यक्रम असल्यानं त्यांना निमंत्रित केलं जाण्याची शक्यता नाही, असं ते म्हणाले.
केसी वेणुगोपाल नागपुरात दाखल : मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल नागपुरात दाखल झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधला आणि तयारीबाबत काही सूचनाही दिल्या. राज्याचे प्रभारी सचिव आशिष दुआ यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितलं की, "आरएसएस आणि भाजपाला हे सांगण्याची गरज आहे की, त्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न करूनही देश काँग्रेसमुक्त झाला नाही. हा तोच आरएसएस आहे ज्यांनी अनेक दशकांपासून आपल्या मुख्यालयावर तिरंगा फडकावलेला नाही".
महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीसह लढणार : काँग्रेस नेते आशिष दुआ पुढे बोलताना म्हणाले की, राहुल गांधींनी 'भारत जोडो यात्रे'दरम्यान काँग्रेससाठी मोठं समर्थन गोळा केलं आहे. आम्ही महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत भाजपाचा सामना करू. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा असून आमची आघाडी बहुतांश जागा जिंकेल. भाजपानं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तेढ निर्माण केली असली, तरी सर्वसामान्य जनता आजही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पाठीशी उभी आहे. आरएसएस आणि भाजपविरुद्ध आमचा वैचारिक संघर्ष सुरूच राहणार असल्याचं ते म्हणाले.
हे वाचलंत का :
- 'धन कुबेर' धीरज साहू यांचे राहुल गांधींशी खास संबंध, जाणून घ्या कसे
- विधानसभा निवडणूक निकाल : काँग्रेस खूर्चीपेक्षा विचाराला महत्व देतं - नाना पटोले
- "देशात भारत-जोडो, परदेशात जाऊन भारत-तोडो, जनतेनं चांगलाच धडा शिकवला", मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींची खेचली