वाराणसी (उत्तरप्रदेश): उत्तरप्रदेशात काँग्रेसने भाजपवर जोरदार आरोप केले आहेत. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना मंगळवारी प्रयागराज येथील आनंद भवनात आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जायचे आहे. मात्र, त्याआधीच उत्तर प्रदेशचे राजकारण तापू लागले आहे. राहुल गांधींना सोमवारी रात्री 10.45 च्या सुमारास वाराणसीला पोहोचायचे होते. मात्र, त्यांच्या विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली नसल्याचा आरोप काँग्रेस नेते अजय राय यांनी विमानतळ प्रशासन आणि भाजप हायकमांडवर केला आहे.
काँग्रेसचे नेते झाले नाराज: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना आनंद भवनात आयोजित एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मंगळवारी पोहोचायचे आहे. सोमवारी रात्री १०.४५ वाजता ते वायनाडहून वाराणसी विमानतळावर पोहोचणार होते आणि तेथून श्री काशी विश्वनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर मंगळवारी सकाळी रस्त्याने प्रयागराजला रवाना होणार होते. या नियोजनाच्या अनुषंगाने सायंकाळीच काँग्रेसचे नेते मोठ्या संख्येने विमानतळावर पोहोचले होते, मात्र रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक काँग्रेस नेत्यांना त्यांचा कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली.
भाजप सरकार राहुल गांधींना घाबरते:काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय राय यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या संपूर्ण प्रकरणावर भाजप सरकारला फैलावर घेतले. ते म्हणाले की, भाजप सरकार राहुल गांधींना घाबरत आहे. त्यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेची भाजपला चिंता आहे. 2024 पूर्वी राहुल गांधी भाजपला अडचणीत आणत आहेत. यामुळे हे सर्व भाजप हायकमांड आणि भाजप सरकारच्या इशाऱ्यावर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.