नवी दिल्ली :काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी अधिर रंजन चौधरी यांचे निलंबन करण्यात आले आहे. अधिर रंजन चौधरी यांच्या निलंबनावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या संसदीय समिती अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज बैठक बोलावली आहे. सकाळी साडेदहा वाजता ही बैठक पक्षाच्या कार्यालयात पार पडणार आहे. त्यामुळे अधिर रंजन चौधरी यांच्या निलंबनावर काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज काँग्रेसने बोलावली बैठक :मणिपूर हिंसाचारामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चांगलेच धारेवर धरले आहे. काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली. त्यामुळे त्यांचे सभागृहातून निलंबन करण्यात आले आहे. आज काँग्रेसने अधिर रंजन चौधरी यांच्या निलंबनावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात संसदीय कार्य समितीच्या बैठकीत अधिर रंजन चौधरींच्या निलंबनावर रणनीती ठरवण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
आवाजी मतदानाने झाला ठराव मंजूर :अधिर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांनी चांगलाच गोंधळ केला होता. त्यामुळे संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव गुरुवारी सभागृहात मांडला. पंतप्रधान आणि मंत्री बोलत असताना विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी यांनी गोंधळ घालत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा त्यांनी दावा केला होता. त्यामुळे या प्रस्तावावर आवाजी मतदानाने ठराव मंजूर करण्यात आला.