नवी दिल्ली :सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधींना शिक्षा सुनावल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांचा सोशल मीडियावर संताप उसळला आहे. एका ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बदनामी केल्याचा आरोप केला आहे. आता त्या मोदींवर गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पंतप्रधानांना त्यावेळची आठवण करून दिली जेव्हा त्यांनी त्यांना 'शूर्पणखा' म्हणून संबोधले होते. ज्या दिवशी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना 2019 मधील त्यांच्या मोदी आडनावावरील टिप्पणीसाठी सुरत न्यायालयाने शिक्षा सुनावली त्याच दिवशी रेणुका चौधरी यांनी हे ट्विट केले आहे, हे विशेष.
रेणुका चौधरी यांच्या हसण्यावर भाष्य : मोदी आडनावावरून केलेल्या टीकेप्रकरणी न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. रेणुका चौधरी यांनी पाच वर्षांपूर्वीच्या संसदेच्या कामकाजाची एक छोटीशी क्लिप ट्विट केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, या वर्गहीन अहंकारी व्यक्तीने मला सभागृहात शूर्पणखा म्हणून संबोधले. मी त्याच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार आहे. आता न्यायालये किती वेगाने काम करतात ते पाहू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये राज्यसभेतील भाषणाच्या वेळी रेणुका चौधरी यांच्या हसण्यावर भाष्य केले होते.