नवी दिल्ली : राहुल गांधींनी ब्रिटनमध्ये भारतातील लोकशाहीवर दिलेल्या विधानावरुन संसदेत गदारोळ सुरु आहे. सरकारने या मुद्यावरून त्यांच्या माफीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी बुधवारी एलारा नावाच्या विदेशी कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अदानी समूह आणि सरकारवर नवा हल्ला चढवला आहे. परदेश दौऱ्यावरून दिल्लीला परतल्यानंतर गांधी यांनी क्षेपणास्त्र आणि रडार अपग्रेडचे कंत्राट अदानी ग्रुप आणि एलारा यांना दिल्याचा आरोप केला आहे. एका ट्विटमध्ये ते म्हणाले, भारताच्या क्षेपणास्त्र आणि रडार अपग्रेडचे कंत्राट अदानीच्या मालकीच्या कंपनीला आणि एलारा नावाच्या संशयास्पद परदेशी संस्थेला देण्यात आले आहे.
विरोधक अदानी मुद्यावरून एकवटले : एलाराला कोण नियंत्रित करत आहे?, सामरिक संरक्षण उपकरणांचे नियंत्रण अज्ञात परदेशी संस्थांना देऊन भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड का केली जात आहे? असे सवाल राहुल गांधींनी सरकारला विचारले आहेत. एकीकडे राहुल गांधी त्यांच्या भारतीय लोकशाहीवरील वक्तव्यावरून वादात सापडले असतानाच विरोधक अदानी मुद्यावरून एकवटले आहेत. तृणमूल काँग्रेस मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाखालील या विरोधापासून दूर आहे.
'मोदींनी परदेशात भारताचा अपमान केला' :दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या ब्रिटनमधील भाषणात राहुल गांधींनी माफी मागितल्याचा इन्कार केला आहे. खरगे म्हणाले की, राहुल गांधी काहीही चुकीचे बोलले नाही. ते केवळ लोकशाहीबद्दल बोलले, तर पंतप्रधानांनी मात्र परदेशात अनेक ठिकाणी बोलून देशाचा अपमान केला आहे. राहुल गांधींच्या विधानावरून झालेल्या गदारोळात काँग्रेसने हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे की, पक्ष या मुद्द्यावर झुकणार नाही. ते म्हणाले की, कॉंग्रेस या मुद्द्यावर आणखी आक्रमक होणार असून हिंडेनबर्ग - अदानी वादात जेपीसीची मागणीवर कायम राहणार आहे.
खरगेंची मोदींवर टीका : काँग्रेस अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून केलेल्या ट्विट मध्ये म्हटले होते की, 'मी तुम्हाला चीनमध्ये केलेल्या वक्तव्याची आठवण करून देऊ इच्छितो. तुम्ही म्हणालात, पूर्वी तुम्हाला भारतीय असल्याची लाज वाटायची. आता तुम्हाला देशाचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटतो. हा भारताचा आणि भारतीयांचा अपमान नव्हता का? तुमच्या मंत्र्यांना त्यांच्या आठवणी ताज्या करायला सांगा'.
हेही वाचा :Satya Pal Malik Security : माझी सुरक्षा कमी करण्यामागे मोदींचा हात, आता गप्प बसणार नाही - माजी राज्यपाल सत्यपाल मलिक