नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी एकवटले होते. केंद्र सरकारसोबतच्या बैठकी निष्फळ ठरल्या मात्र, शेतकऱयांनी आंदोलन सुरूच ठेवले. अखेर आज त्यांच्या आंदोलनाला (Farmers Protest) यश आलं आहे. गेल्या वर्षी देशात लागू करण्यात आलेले तीन कृषी कायदे मागे (Farm laws rolled back) घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज केली आहे. कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते. पण तरी ते आम्ही त्यांना समजवू शकलो नाही, ही आमचीच चूक आहे, असे मोदी देशाला संबोधित करताना म्हणाले. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांनीही या घटनाक्रमावर प्रतिक्रिया दिली.
देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रह करून अहंकाराचे डोके खाली झुकवले. अन्यायाविरुद्धच्या या विजयासाठी सर्वांचे अभिनंदन, जय हिंद, जय हिंद का किसान, असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे. यासोबतच राहुल गांधींनी आपला एक जुना व्हिडिओ टि्वट केला आहे. त्यात राहुल गांधी म्हणताना दिसतात, माझे हे बोल कायम लक्षात ठेवा, सरकारला तीन कृषी कायदे परत घ्यावेच लागतील.