मुंबई -संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ घोटाळ्यात अटक केली. ईडीने संजय राऊताना अटक केल्यानंतर भाजपवर अनेक नेत्यांनी टीका केली आहे. याबाबत राहुल गांधी यांनीही नाव न घेता भाजपवर हल्लाबोल केला आहे. जे झुकणार नाहीत, केंद्र सरकारच्या विरोधात बोलतील त्यांना त्रास दिला जाईल, पण शेवटी सत्याचा विजय होईल, अशाप्रकारचे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
पत्रा चाळ घोटाळ्याचा आरोप करुन संजय राऊत यांना ईडीने 16 तासाच्या मॅरेथॉन चौकशीनंतर अटक केली. मात्र संजय राऊत भाजपवर सातत्याने हल्लाबोल करत असल्याने सूडभावनेतून भाजपने ही कारवाई केल्याची टीका शिवसेना आणि महाविकास आघाडीकडून होत आहे. त्यातच आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही भाजपवर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संजय राऊतांच्या अटकेवर ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. राजाचा संदेश साफ आहे, जो आमच्याविरोधात बोलेल त्याला अडचणींचा सामना करावा लागेल. सरकारी एजंसीचा दुरोपयोग करुन विरोधकांना नामोहरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. खऱ्याची बोलती बंद करण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र खऱ्याचा विजय होईल आणि तानाशाहांना हार पत्करावी लागेल' असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
काय आहे पत्रा चाळ घोटाळा प्रकरण? - पत्राचाळ जमीन घोटाळा 2007 मध्ये सुरू झाला. हा घोटाळा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरण (म्हाडा), प्रवीण राऊत, गुरुआशिष कन्स्ट्रक्शन अँड हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) यांच्या संगनमताने झाल्याचा आरोप आहे. पत्राचाळमध्ये 500 हून अधिक कुटुंबे राहत होती. या जमिनीवर सदनिका बांधून तेथे राहणाऱ्या लोकांना देण्यात येणार होत्या. यासाठी गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी (GACPL) सोबत करार करण्यात आला. या कंपनीसोबत झालेल्या करारानुसार या भूखंडावर तीन हजार सदनिका बांधण्यात येणार होत्या. यातील 672 फ्लॅट तेथील चाळीत राहणाऱ्या लोकांना द्यायचे होते. येथे फ्लॅट बनवणाऱ्या कंपनीला जमीन विकण्याचा अधिकार नव्हता. परंतु, कंपनीने कराराचे उल्लंघन करून ही जमीन नऊ वेगवेगळ्या बिल्डरांना 1,034 कोटींना विकल्याचा आरोप आहे.