नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांवर टीका केली. हा देश फक्त चार लोक चालवत असल्याचे ते म्हणाले. बाजार समित्या बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यांच्या भाषणावेळी भाजपच्या खासदारांनी मोठ्या प्रमाणात सभागृहात गदारोळ घातला.
>>राहुल गांधींच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ येथे पहा<<
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायद्यांच्या हेतूबद्दल बोला असे म्हणत होते, मात्र त्यांचा हेतू फक्त आपल्या मित्रांची मदत करणे आहे, असे राहुल गांधी म्हणाले. काही वर्षांपूर्वी ‘हम दो हमारे दो’ घोषणा देण्यात आली होती. कोरोना ज्याप्रमाणे दुसऱ्या रुपात आला आहे, तसेच ही घोषणा आली आहे. हा देश चार लोक चालवतात ‘हम दो और हमारे दो’,” ते चार लोक कोण आहेत ते तुम्ही समजून घ्या, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. या कायद्यांमुळे भूक, बेरोजगारी आणि आत्महत्या हे तीन पर्याय आपण दिले आहेत असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर उत्तर
काँग्रेसह विरोधी पक्ष नवीन कृषी कायद्यांच्या हेतू आणि मसुद्याविषयी (कॉन्टेन्ट) बोलत नाहीत, असे पंतप्रधान काल सभागृहात म्हणाले होते. विरोधी पक्षांनी त्यावर बोलणे गरजेचे असल्याचे मोदी म्हणाले होते. यावर बोलताना राहुल गांधी यांनी तीन कायद्यांचा हेतू आणि मसुद्याचे विश्लेषण करून सांगण्याचा प्रयत्न केला.
तीन कायद्यांच्या कॉन्टेंटवर बोलताना राहुल गांधी म्हणाले-
- पहिला कायदा - देशातील कोणताही व्यक्ती कितीही प्रमाणात धान्य, भाजीपाला, फळे खरेदी करू शकतो. ही खरेदी जर एखाद्यानेच अमर्यादित प्रमाणात केली तर मंडीमध्ये कोण जाणार? मंडीत जाऊन कोण खरेदी करणार? म्हणजेच पहिल्या कायद्याद्वारे मंडीला संपवले जाईल. याचा उद्देश मंडीला बंद करणे हा आहे.
- दुसरा कायदा - देशातील कोणताही व्यक्ती (मोठे उद्योगपती) कितीही प्रमाणात धान्य, भाजीपाला, फळे यांचा साठा करून ठेवू शकतात. म्हणजेच साठेबाजी करण्यासाठी खुली परवानगीच दिली जाणार, त्यातून साठेबाजी न करण्याचा कायदा मोडीत निघू शकतो. दुसऱ्या कायद्याचा हेतू हा दिसतो की, जीवनावश्यक वस्तू कायदा बंद करणे.
- तिसरा कायदा - देशातील एखादा शेतकरी त्याचा शेत माल खासगी उद्योगपतींना विकल्यानंतर त्याच्याकडून झालेल्या पैशांच्या व्यवहाराविषयी न्यायालयात दाद मागू शकत नाही.