नवी दिल्ली - नोटाबंदीला आज चार वर्षं पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर आजचा दिवस काँग्रेस 'विश्वासघात दिवस' म्हणून साजरा करत आहे. त्यानिमित्ताने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. नोटाबंदी म्हणजे भारतातील गरीब, शेतकरी, मजूर आणि लहान दुकानदारांवरी हल्ला होता. नोटाबंदी हे भारताच्या असंघटित अर्थव्यवस्थवर आक्रमण होते. हा हल्ला ओळखून संपूर्ण देशाला या हल्ल्याविरूद्ध एकत्र लढावे लागेल, असे राहुल गांधींनी म्हटलं आहे.
पंतप्रधानांनी घोषित केलेल्या नोटबंदीचा फटका देशातील प्रत्येक घटकाला बसला. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था ढासळली. पंतप्रधान भाषणात बनावट नोटांवर बोलतात. बनावट नोटांची आकडेवारी मात्र, पंतप्रधानांना खोटे ठरवते आणि देशासोबत विश्वासघात झाल्याचे सिद्ध करते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
भाजप सरकारच्या निर्णयांनी प्रत्येक वेळी देशातील जनतेवर हल्ला केला आहे. असाच एक फटका नोटाबंदीचा होता; ज्याने देशाची अर्थव्यवस्था नष्ट केली आहे. नोटाबंदीविरोधात आवाज उठवून पंतप्रधानांना आपल्या चुकीची जाणीव करून द्या, असे आवाह काँग्रेसने केले आहे.
8 नोव्हेंबर 2016 ला चलनातील नोटा बाद -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी भारतीय चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बाद झाल्याची घोषणा केली होती. त्याला आज (रविवारी) 4 वर्षे पूर्ण झाली. या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील काळा पैसा बाद होईल, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला होता. मात्र, प्रत्यक्षात उलटेच झाले. बाद केलेल्या नोटांपैकी तब्बल 99 टक्के नोटा या बँकेत जमा झाल्या. मोदी यांच्या या निर्णयामुळे अनेक महिने चलन तुटवडा निर्माण झाला होता, अशी टीकाही कांग्रेसने केली.