हैदराबाद Congress Foundation Day :भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) किंवा काँग्रेस भारतातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षांपैकी एक आहे. सध्या राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. आजच्या दिवशी म्हणजेच 28 डिसेंबर 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. या वर्षी देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस आपला 139 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आणि आधुनिक भारताच्या विकासात काँग्रेसचा मोठा वाटा राहिला आहे. इंग्रजांचे देशावर राज्य असताना राष्ट्रवाद आणि लोकशाहीच्या आदर्शांनी प्रेरित असलेल्या शिक्षित भारतीयांच्या गटानं काँग्रेसची स्थापना केली होती. काँग्रेसच्या संस्थापकांमध्ये अॅलन ऑक्टाव्हियन ह्यूम आणि दादाभाई नौरोजी यांचा समावेश होता.
भारतीयांना प्रतिनिधित्व देण्याची मागणी : भारतीयांना अधिकाधिक राजकीय प्रतिनिधित्व आणि अधिकारांची मागणी करण्यासाठी भारतीय राष्ट्रवादीसाठी काँग्रेसची स्थापना करण्यात आली. स्वातंत्र्यलढ्यादरम्यान, पक्षानं अहिंसेचे तत्त्व कायम ठेवलं. सुधारणांच्या मागणीच्या घटनात्मक माध्यमांवर लक्ष केंद्रित केलं. पक्षाचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होते. 28 डिसेंबर 1885 रोजी बंबई (आताची मुंबई) इथं काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं. यात 72 प्रतिनिधी उपस्थित होते. पक्षानं सुरुवातीला शेतकरी आणि कामगारांचं जीवन सुधारणे, शिक्षण आणि सामाजिक सुधारणांना प्रोत्साहन देणे आणि भारतीयांसाठी अधिक राजकीय प्रतिनिधित्वाची मागणी करणे यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले होते.
काँग्रेसनं जागवली स्वदेशीची भावना : कालांतरानं काँग्रेसचा आकार आणि प्रभाव जसजसा वाढत गेला तसतशी काँग्रेसचं भारतीय राजकारणात महत्त्व वाढत गेलं. पक्षानं वार्षिक अधिवेशन घेतले. त्यात देशभरातील हजारो प्रतिनिधी उपस्थित होते. या अधिवेशानांचा उपयोग पक्षाची धोरणे ठरवण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी तसंच पुढारी निवडण्यासाठी केला जात होता. काँग्रेसनं भारतीय स्वातंत्र्य चळवळीत, ब्रिटीश राजवटीविरुद्ध बहिष्कार आणि मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. काँग्रेसचं नेतृत्व महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु आणि सरदार पटेल यांच्यासह अनेक मोठ्या व्यक्तींनी केलंय. या पुढाऱ्यांनी पक्ष आणि स्वातंत्र्य चळवळीला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवण्याच्या अंतिम ध्येयाकडे मार्गदर्शन करण्यास मदत केली.