नवी दिल्ली: काँग्रेस राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची (13 जुन)पासून सलग तीन दिवस ई़डीकडून चौकशी झाली. दरम्यान, राहुल यांना समन्स बजावण्यात आले त्या दिवसापासूनच देशभरात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आहे. ( Congress delegation to meet Speaker Om Birla ) यामध्ये पोलीस आमच्यावर अत्याचार आणि हिंसाचार करत आहेत. तसेच, काँग्रेसच्या मुख्यालयात घुसून पोलिसांनी हल्ला केला अशी माहिती लोकसभा अध्यक्षांना दिली आहे असही चौधरी म्हणाले आहेत.
चौधरी म्हणाले की, पोलीस ठाण्यातही दिल्ली पोलिसांनी काँग्रेस खासदारांना आणि कार्यकर्त्यांना दहशतवादी असल्यासारखे वागवले आहे. सलग 3 दिवस राहुल गांधींना 10-12 तास प्रदीर्घ चौकशीसाठी बोलावण्यात आले. यावर आमचा कोणताही आक्षेप नाही. आम्हाला एवढेच सांगायचे आहे की, सूडाचे आणि हिंसाचाराचे राजकारण करू नका असही ते म्हणाले आहेत.
काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या संसदीय पक्ष कार्यालयात बैठक घेऊन राहुल गांधींच्या ईडीच्या चौकशीमुळे उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली. त्यात काँग्रेस नेत्यांशिवाय सरचिटणीसही सहभागी झाले होते. काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, बैठकीत पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांवर दडपशाहीच्या कारवाईबाबत पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली आहे.
मारहाण केल्याचा आरोप -दिल्ली पोलिसांनी काँग्रेस मुख्यालयावर हल्ला केला आणि अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसने बुधवारी केला. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला होता की, 'भाजप आणि मोदी सरकारच्या दिल्ली पोलिसांनी गुंडगिरीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. भाजपच्या सांगण्यावरून पोलिसांनी दरवाजे तोडून काँग्रेस मुख्यालयात प्रवेश केला आणि नेत्यांना व कार्यकर्त्यांना मारहाण केली.
सुरजेवाला यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर एफआयआर नोंदवावा, त्यांना निलंबित करावे आणि त्यांची विभागीय चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्याचवेळी दिल्ली पोलिसांनी या प्रकरणातील आरोप फेटाळून लावले होते. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "काही हाणामारी झाली असेल. परंतु, पोलीस काँग्रेसच्या कार्यालयात गेले नाहीत. पोलिसांनी बळाचाही वापर केला नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, राहुल गांधी यांच्या ईडीच्या चौकशीबाबत काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
दुसरीकडे, काँग्रेसने बुधवारी तुघलक रोड पोलीस ठाण्यात पोलिसांच्या प्रवेशाविरोधात आणि दिल्लीतील 24 अकबर रोड येथील पक्षाच्या मुख्यालयावर कथित हल्ल्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कोणतीही माहिती न देता हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेस नेते अविनाश पांडे, हरीश चौधरी, प्रणव झा, चेल्ला वामशी रेड्डी आदींनी एसीपी आणि एसएचओ यांची भेट घेतली.