कोलकाता - देशभरामध्ये कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने अनेक निर्बंध लादले आहेत. मात्र, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यात अनेकांनी निष्काळजीपणा करत कोरोना नियमांचे पालन केले नाही. हा निष्काळजीपणा जीवावर बेतला आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील समशेरगंज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रेजुल हक यांचे कोरोनामुळे गुरुवारी निधन झाले.
कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर रेजुल हक यांच्यावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे प्रदेश सचिव रोहन मित्रा यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे बुधवारी पश्चिम बंगालमध्ये कोरोना विषाणूची 5 हजार 892 नवीन प्रकरणे नोंदली गेली असून आजपर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे.
निवडणूक आयोगाने कोरोनासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलविली -
विधानसभेसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान पार पडत आहे. यातील चार टप्पे पार पडले असून पाचव्या टप्प्यातील मतदान 17 एप्रिल रोजी होणार आहे. प्रचारासाठी पक्षांच्या नेत्यांकडून सभा घेण्यात येत आहे. या सभांमध्ये कोरोना नियमांचे पालन करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने शुक्रवारी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे.महत्त्वाचे म्हणजे देशातील बर्याच राज्यांत कोरोना विषाणूची स्थिती अत्यंत वाईट आहे. गुरुवारी, एका दिवसात देशभरात कोरोना विषाणूचे 2,00,739 नवीन रुग्ण आढळले. दैनंदिन प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे देशात सक्रिय प्रकरणांची संख्याही 14,71,877 वर पोहचली आहे.